मुंबईकरांनो! घाबरू नका, पण काळजी घ्या; 10 हजारांपर्यंत रुग्ण वाढले तरी पालिका सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून भविष्यात रुग्णांची संख्या 10 हजारांपर्यंत जरी वाढली तरी त्या परिस्थितीला सामोरे जाऊन त्यावर मात करण्याची पालिकेची तयारी आहे. त्यामुळे मुंबईकरांनो! घाबरून जाऊ नका, पण काळजी घ्या, कोरोना नियमांचे पालन करा, असे आवाहन पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी केले आहे.

मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढल्याने पालिका सतर्क झाली आहे. मुंबईत मंगळवार, 23 मार्चला 40 हजार 400 चाचण्या झाल्या त्यात 5 हजार 458 रुग्ण सापडले. यापैकी 83 टक्के रुग्ण हे विना लक्षणांचे होते तर 10 जणांचा मृत्यू झाला. बुधवार, 24 मार्चला 47 हजार चाचण्या करण्यात आल्या असत्या 5 हजार 365 रुग्ण सापडले. यात 84 टक्के रुग्णांना लक्षणे नव्हती तर 6 जणांचा मृत्यू झाला.

खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना चाचण्या आणि लसीकरणाचा वेग वाढवण्यात येणार आहे. दिवसाला कोरोनाच्या 60 हजार चाचण्या केल्या जाणार असून त्याच्या जोडीला दिवसाला 1 लाखांपर्यंत लसीकरण करण्याचे उद्दिष्टय़े ठेवले आहे. त्याचबरोबर 75 हजार बेड सज्ज असून येत्या 15 दिवसांत आयसीयू आणि व्हेंटिलेटर असलेल्या बेडची संख्या 13 हजारांवरून 23 हजारांवर वाढवण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिली.