डास प्रतिबंधासाठी हटवले 8 हजार टायर्स, 2 लाख 84 हजार 139 वस्तूही पालिकेने हटवल्या

23

सामना प्रतिनिधी, मुंबई

डासांमुळे होणाऱया साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी पालिकेने डास प्रतिबंधाची जोरदार मोहीम राबवताना सहा महिन्यात सुमारे 8 हजार टायर्स हद्दपार केले आहेत. तसेच 2 लाख 84 हजार 139 वस्तू हटवल्या आहेत.

पाकसाळ्यात साथीचे आजार डोके वर काढतात. त्यामुळे ‘एडिस इजिप्ती’ डासांची उत्पत्तीस्थळे तत्काळ नष्ट करण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे. बाटलीचे झाकण, टायर, थर्माकोल, नारळाच्या करवंटय़ा, एसी, फ्रीजचा डिप्रॉस्ट ट्रे, रिकामी शहाळी, रोप कुंडय़ांखालील ताटल्या यासारख्या विविध वस्तूंमध्ये साचलेल्या काही थेंब पाण्यात ही डासांची उत्पत्ती होते. परिणामी डेंग्यू, हिवताप यासारख्या घातक रोगांच्या प्रसारासाठी कारणीभूत ठरतात. या पार्श्वभूमीवर कार्यवाही करताना पालिकेने 1 जानेवारी ते 20 जुलै 2019 या कालावधीत 8 हजार 729 टायर्स हटवले असून 2 लाख 84 हजार 139 एवढय़ा छोटय़ा-मोठय़ा पाणी साचू शकणाऱ्या इतर वस्तूही हटवल्या आहेत. गेल्या सात महिन्यात सर्वाधिक म्हणजे 51 हजार 534 वस्तू महापालिकेच्या ‘ई’ विभागातून हटवण्यात आल्याची माहिती पालिका कीटकनाशक विभागाचे अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी दिली.

कोरडा दिवस पाळा
अनेक घरांच्या बाहेर पाणी साठवण्यासाठी पिंप, ड्रम वापरले जातात. यामध्येदेखील मोठय़ा प्रमाणात डेंगी आजार पसरवणाऱ्या डासांच्या अळ्या आढळून येतात. याकरिता हे पिंप व इतर पाणी साठवण्यची भांडी आठवडय़ातून एक दिवस पूर्णपणे कोरडे ठेवून आठवडय़ातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन पालिकेने केले.

पाण्याचे पिंप वा पाणी साठवण्याची इतर भांडी प्रथम पूर्णपणे उलटे करुन ठेवावीत. त्यानंतर काही वेळाने हे पिंप व इतर भांडी कोरडय़ा व स्वच्छ कापडाने आतून पुसावीत, जेणेकरून पिंपाच्या आतील बाजूला चिकटलेली डासांची अंडी नष्ट होतील, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या