आंतरराष्ट्रीय दर्जाचे मोफत शिक्षण, मुंबई महापालिका शाळेत Cambridge बोर्डाची शाळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शिक्षणासाठी देशात आणि जगात जे सर्वोत्तम शैक्षणिक पर्याय उपलब्ध आहेत त्याच पद्धतीचे शिक्षण पालिकेतील विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असा विश्वास पर्यावरणमंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. आगामी काळात राज्यभरातील विद्यार्थ्यांनाही असे शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करणार आहे, असेही ते म्हणाले.

मुंबई महानगरपालिकेच्या पब्लिक स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय बोर्डाचा शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आज सह्याद्री अतिथीगृह येथे महापालिका आणि केंब्रिज विद्यापीठामध्ये सहमती करारावर स्वाक्षरी झाली. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबई पब्लिक स्कूलमध्ये या आधीच सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचे मोफत अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. आता आंतरराष्ट्रीय बोर्डाचा अभ्यासक्रमही सुरू करण्यात येणार आहे. महापालिका आपल्या शाळांमध्ये शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळांसारख्या इतर उपक्रमांनाही प्रोत्साहन देत आहे. शाळांच्या इमारती आणि पायाभूत सुविधा अद्ययावत करण्यावरही महापालिकेचा भर आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच इतर शैक्षणिक साहित्यही मोफत पुरविण्यात येणार आहे. या शाळांमधील दर्जेदार शिक्षणामुळे चालू शैक्षणिक वर्षात 4 हजार विद्यार्थी संख्येसाठी 10 हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाल्याने लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड करावी लागली हे या शाळांचे यश असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, सहआयुक्त अजित कुंभार, केंब्रिज दक्षिण आशियाचे विभागीय संचालक महेश श्रीवास्तव, शिक्षणतज्ञ फ्रान्सिस जोसेफ, केंब्रिज विद्यापीठ प्रेस हेड अजय प्रताप सिंह, महापालिका शिक्षण अधिकारी राजू तडवी, शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे आदी उपस्थित होते.

अभ्यासक्रम 2022 पासून सुरू

केंब्रिज हे जगातील दर्जेदार शिक्षणाचे माध्यम असल्याने त्यांच्या माध्यमातून मुंबईतील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा उत्तम पर्याय उपलब्ध होईल. पालिकेच्या किती शाळांमध्ये हा अभ्यासक्रम सुरू करता येऊ शकेल याचा येत्या दोन महिन्यांत अभ्यास करून 2022 च्या शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रयत्न असेल, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.

केंब्रिज बोर्डासाठी निवड करण्यात आलेल्या पालिका शाळांमध्ये सीबीएससी, आयसीएससीप्रमाणेच मोफत दर्जेदार शिक्षण मिळणार आहे.

करारामुळे केंब्रिज बोर्डाच्या संलग्न शाळेला शिक्षक निवड प्रक्रिया, शिक्षक प्रशिक्षण, पालक प्रबोधन अशा अनेक क्षेत्रांत सहकार्य मिळणार आहे.