पालिका शाळांमध्ये आता सीबीएसई नर्सरीचे वर्ग, 12 शाळांमध्ये होणार सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिकेने पहिलीपासून सुरू केलेल्या सीबीएसई बोर्डाच्या शाळांना मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता आता पालिकेच्या सीबीएसई-आयसीएसई नर्सरीचे वर्ग भरवण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महापालिकेच्या 12 शाळांमध्ये नर्सरीचे वर्ग सुरू होणार आहेत.

मुंबई महानगरपालिकेने 2021-2022 या शैक्षणिक वर्षापासून 11 शाळांमध्ये सीबीएसईचे, तर एका शाळेमध्ये आयसीएसईचे ज्युनियर केजी, सीनियर केजी, पहिली ते सहावीपर्यंतचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. मात्र पालक तसेच लोकप्रतिनिधींकडून नर्सरीपासून शाळांचे वर्ग सुरू करण्याची मागणी होत आहे. त्याची दखल घेत पालिकेने आता या सर्व शाळांमध्ये नर्सरीपासूनचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव शिक्षण समितीसमोर मांडण्यात आला असून खासगी संस्थांकडून शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे.

या शाळांमध्ये सुरू होणार वर्ग

प्रतीक्षानगर मनपा शाळा, दिंडोशी मनपा शाळा, जनकल्याण मनपा शाळा (मालाड), तुंगा व्हिलेज शाळा (कुर्ला), राजावाडी मनपा शाळा (विद्याविहार), अझीझबाग मनपा शाळा (चेंबूर), हरियाली व्हिलेज मनपा शाळा (विक्रोळी पूर्व), मिठागर शाळा (मुलुंड पूर्व), भवानी शंकर रोड-पालिका शाळा, काणेनगर मनपा शाळा या दहा शाळांबरोबरच सीबीएसईच्या जोगेश्वरीतील पूनमनगर आणि आयसीएसई वुलन मिल शाळेत नर्सरीपासून वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.