
माहीम येथील मिया मो. छोटानी रोडवरील मुंबई महापालिकेची इमारत जुनी झाल्यामुळे ती पूर्णपणे पाडून नव्याने बांधण्यात येणार आहे. या दरम्यान शाळेतील दीड हजार विद्यार्थ्यांचे स्थलांतर वरळी येथील पालिकेच्या शाळेत केले जाणार होते. मात्र शिवसेना नेते – खासदार अनिल देसाई आणि युवासेनेच्या पाठपुराव्यामुळे त्या दीड हजार विद्यार्थ्यांचे आता माहीममधीलच कापड बाजार महापालिका शाळेत स्थलांतर केले जाणार आहे.
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर तसेच युवासेना पदाधिकारी स्वप्नील सूर्यवंशी, हर्षल पळशीकर यांनी नवनियुक्त शिक्षणाधिकारी संदीप संगवे यांची भेट घेतली. माहीममधील या शाळेत धारावीतील सुमारे 1200 विद्यार्थी असून त्यांच्यासाङ्गी माहीममधून वरळीत येणे हे प्रवासाच्या दृष्टीने असुरक्षित आणि गैरसोयीचे होणार आहे, याची खात्री पटवून दिली. दरम्यान, शिवसेना नेते – खासदार अनिल देसाई यांनीही मुंबई महापालिका उपायुक्त प्राची जांभेकर यांच्याशी चर्चा करून मुलांना माहीममध्ये स्थलांतरित करावे, अशी मागणी केली. त्यावर सर्व विद्यार्थ्यांचे माहीम येथील कापड बाजार शाळेत स्थलांतर केले जाणार आहे, असे आश्वासन जांभेकर यांनी दिले आहे.