
सामना प्रतिनिधी । मुंबई
पालिका शाळांत दर्जेदार शिक्षण आणि अत्याधुनिक सुविधा दिल्या जात असताना आता विद्यार्थ्यांच्या दातांच्या आरोग्याची काळजीही घेतली जाणार आहे. यामध्ये पालिका शाळांत तज्ञ डॉक्टरांची टीम जाऊन विद्यार्थ्यांच्या दातांची तपासणी करणार आहे. यावेळी ‘ब्रश कसे करावे’ यापासून दातांचे आरोग्य कसे जपावे याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. पुढील सहा महिन्यांत पालिकेच्या सर्व शाळांमधील १ लाख ३६ हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत काळाचौकी येथील अभ्युदयनगर पालिका शाळेत या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये ‘मौखिक स्वास्थ्या’च्या जागरूकतेसाठी मुंबई महानगरपालिका, ‘हेल्दी स्माइल’ फाऊंडेशन आणि ‘कोलगेट’च्या संयुक्त विद्यमाने या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात विद्यार्थ्यांना दातांच्या आरोग्याची माहिती दिली जाणार असून त्यांचे ‘डेंटल चेकअप’देखील करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतल्यामुळे हा उपक्रम राबवणे शक्य झाले असल्याचे ‘हेल्दी स्माईल’चे डॉ. संदेश मयेकर यांनी सांगितले. या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी उपमहापौर हेमांगी वरळीकर, शिवसेना खासदार अरविंद सावंत, नगरसेविका श्रद्धा जाधव, स्नेहल आंबेकर, किशोरी पेडणेकर, सिंधू मसुरकर, नगरसेवक अमेय घोले, समाधान सरवणकर, साईनाथ दुर्गे, सचिन पडवळ, दत्ता पोंगडे, शिक्षणाधिकारी महेश पालकर, शिक्षण उपायुक्त मिलीन सावंत, डॉ. सलोनी मयेकर आदी उपस्थित होते.
मग अधिकारही द्या! – आदित्य ठाकरे
मुंबईत कोणतीही आपत्कालीन स्थिती निर्माण झाली तर पालिकेला जबाबदार ठरवण्यात येते, मात्र पालिकेला असलेल्या अधिकारांचा यावेळी विचार करणे गरजेचे आहे. मुंबईत एखादा रस्ता करायचा म्हटला तर वेगवेगळ्या ४१ एजन्सीची परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे पालिकेवर अनेक कामे करताना मर्यादा येतात. त्यामुळे जबाबदारी टाकता, मग अधिकारही द्या अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी सरकारकडे केली.



























































