
या वर्षी पावसाळा आठवडाभर आधी सुरू होणार असल्याचे समोर आले असले तरी पालिकेची पावसाळापूर्व कामे वेगाने सुरू आहेत. नालेसफाई अंतिम टप्प्यात असून साचणारे पाणी उपसण्यासाठी मुंबईभरात 477 पंप बसवण्यात आल्याची माहिती पायाभुत सुविधा उपायुक्त उल्हास महाले यांनी दिली.
एका तासात 50 मिमी पाऊस झाला तरी पाणी वाहून नेण्याची क्षमता मुंबईच्या पर्जन्य जलवाहिन्यांची आहे. मात्र गेल्या काही वर्षांत एका तासात तब्बल 200 ते 300 मिमी पाऊस झाल्याचे प्रकार घडल्याने पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून पाणी तुंबणाऱया ठिकाणांचा शोध घेऊन संबंधित ठिकाणी पाणी तुंबू नये यासाठी कार्यवाही केली जाते. शिवाय या वर्षी साचणारे पाणी उपसण्यासाठी पंपांची संख्याही वाढवण्यात आल्याचे महाले यांनी सांगितले.
पालिकेच्या माध्यमातून नालेसफाई समाधानकारक करण्यात येते. पाणी उपसण्यासाठी पंप बसवण्यात येतात. मात्र नाल्यातील कचरा, प्लॅस्टिक, अविघटनशील कचरा साचल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्यात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे या गोष्टी रहिवाशांनी टाळल्या पाहिजेत, जेणेकरून पालिकेच्या कामाला हातभार लागेल.
– उल्हास महाले, उपायुक्त, पायाभूत सुविधा






























































