
मुंबईत महापालिकेने 10 जुलै 2020 पासून गणेश मंडळांचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. 19 ऑगस्ट 2020 पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. जगभरातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, महानगरपालिकेने काही अटी व शर्ती श्री गणेश मंडळाना दिल्या आहेत. यासोबत श्री गणेश मंडळाने हमीपत्र ही देणे बंधनकारक केले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत साधारणतः 12 हजार छोटी-मोठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. याहीवर्षी गणेशोत्सव मंडळांना ऑनलाईन अर्ज भरण्याची ‘एक खिडकी’ (वन विंडो) कार्यपद्धती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामुळे आता मंडळांना पोलीस, वाहतूक पोलीस व अग्निशमन दल यांच्याकडे परवानगीसाठी जाण्याची गरज भासणार नाही. मंडळांकडून परवानगीसाठी आकारण्यात येणारे नाममात्र शुल्क रुपये 100/- यावर्षी कोरोना साथरोगाच्या परिस्थितीमुळे यावर्षापुरते कोणत्याही मंडळाकडून आकारण्यात येणार नाही. तसेच मंडळांकडे उपलब्ध असणारा अल्प कालावधी लक्षात घेता, गतवर्षी ज्या मंडळांना परवानगी दिली होती, त्या मंडळांचे अर्ज यावर्षी ऑनलाईन पद्धतीतच स्थानिक पोलीस ठाणे व वाहतूक पोलीस शाखेकडे न पाठविता मागील वर्षीच्या परवानगीच्या आधारे त्वरित परवानगी देण्यात येईल. परंतु, त्यासाठी मागील वर्षी दिलेल्या परवानगीचा क्रमांक अर्जामध्ये न चुकता नमूद करणे आवश्यक आहे.
अर्जदार विहित कालावधीत कुठूनही वा कधीही अर्ज करु शकतो. ही ऑनलाईन सुविधा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या वेब पोर्टलवर मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज करतानाची कार्यपद्धती – मनपा पोर्टलवरील > ऑनलाइन सेवा > परिरक्षण > गणपती / नवरात्रीच्या टॅबखालील Ganpati/Navratri Mandap Application मध्ये नमूद विविध लिंकनुसार अर्ज सादर करावा. ऑनलाईन पद्धतीने मंडळांनी अर्ज करण्याची मुदत 19 ऑगस्ट 2020 (सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत) आहे. कोणतीही अडचण असल्यास संबंधित विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्याशी संपर्क साधावा. यावर्षी कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक बाबींबाबत विशेष हमीपत्र मंडळांना देणे बंधनकारक आहे. ऑनलाईन प्रणालीतून हे हमीपत्र डाऊनलोड करावे, त्यावर संबंधीतांच्या स्वाक्षऱ्या करुन अपलोड करावे व अर्जासह सादर करावे.





























































