
सामना ऑनलाईन । मुंबई
चर्चगेट येथील मुंबई जिमखाना आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये बेकायदा सिलिंडर आढळल्यामुळे पालिकेने धडक कारवाई करीत हे सिलिंडर जप्त केले. याची गंभीर दखल घेत महाराष्ट्र आग प्रतिबंधक आणि जीव सुरक्षा कायद्यांतर्गत दोन्ही संस्थांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
पालिका प्रशासनाकडून मुंबईभरात अग्निशमन दल, पालिका अधिकारी यांची संयुक्त तपासणी आणि कारवाईची मोहीम सुरू आहे. या पाहणीत गुरुवारी अग्निशमन दलाने मुंबई जिमखान्यावर धडक देऊन तपासणी केली असता स्वयंपाकघरात तीन गॅस सिलिंडर बेकायदेशीरपणे वापरले जात असल्याचे निदर्शनास आले. यानंतर हे सिलिंडर तातडीने जप्त करण्यात आले. या ठिकाणी सिलिंडरचा बेकायदेशीरपणे व्यावसायिक वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे या कारवाईत क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये तब्बल 42 सिलिंडर आढळले. हे सर्व सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. मुंबईत गेल्या काही दिवसांत आगी लागून झालेल्या जीवित आणि वित्तहानीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही संस्थांवर पालिकेकडून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
























































