पाच वर्षांत मुंबई ‘टीबी’मुक्त करणार! मुंबई महानगरपालिकेचे लक्ष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईला 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त करण्यासाठी पालिका आता खासगी रुग्णालये, वैद्यकीय संस्था यांची मदत घेण्यात येणार आहे. खासगी रुग्णालयांच्या सहभागातून कोरोनावर यशस्वी नियंत्रण मिळविल्यानंतर महापालिकेने क्षयरोगमुक्त शहरासाठी खासगी रुग्णालयांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर काही दिवसांतच अनेक हॉटस्पॉट तयार झाले. त्यामुळे पालिकेची रुग्णालये, जम्बो कोविड सेंटरमधील बेडही अपुरे पडू लागले. त्यामुळे पालिकेने खासगी रुग्णालये, खासगी वैद्यकीय संस्था यांची मदत घेतली व कोरोनाच्या पहिल्या व दुसऱया लाटेवर यशस्वीपणे नियंत्रण मिळविले. या पार्श्वभूमीवर 2025 पर्यंत मुंबईतून क्षयरोग निर्मूलन करण्याकरिता खासगी क्षेत्रातील रुग्णालयांसमवेत भागीदारी करण्याचा निर्णय महापालिका आरोग्य प्रशासनाने घेतला आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. कोरोनाच्या कालावधीत मुंबईतील नागरिकांना पालिकेने खासगी क्षेत्रातील व्यावसायिकांच्या मदतीने विविध आरोग्य सुविधा पुरविल्या. कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचार, विलगीकरण व लसीकरण मोहीम या सर्वांमध्ये खासगी क्षेत्राबरोबर पालिकेने भागीदारी यशस्वी करून दाखविली.

काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली खासगी क्षेत्रातील भागीदारांसोबत नुकतीच एक बैठक पार पडली. कोरोना नियंत्रण व्यवस्थापनामध्ये जी 43 खासगी रुग्णालये पालिका प्रशासनासमवेत कार्यरत होती त्यांना क्षयरोग निर्मूलन – 2025 करिता सहभागी होण्याकरिता निमंत्रित करण्यात आले आहे.

50 टक्के क्षयरुग्ण खासगी क्षेत्रात
मुंबईतील 50 टक्के क्षयरोग रुग्णसंख्या खासगी क्षेत्रातून येत असल्याकारणाने खासगी क्षेत्राने क्षयरोग निर्मूलन करण्यामध्ये आपापल्या क्षमतेप्रमाणे पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे. यावेळी कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमामधील खासगी रुग्णालये यांना सहभागी होण्याकरिता उपलब्ध असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. हिंदुजा रुग्णालय, युनिसन मेडिकेअर, डॉक्टर्स फॉर यू, के. जे. सोमय्या रुग्णालय, सर्वोदय रुग्णालय या रुग्णालयांमध्ये औषध प्रतिरोधी क्षयरोग उपचार पेंद्र उपक्रम राबविण्यात येत आहेत. या खासगी रुग्णालयांचेही डॉ. गोमारे यांनी अभिनंदन केले.

क्षयरोगावर दोन नवीन औषधे

राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत उपलब्ध उपक्रमांमध्ये सहभाग घेतल्याने रुग्णांकरिता दोन नवीन औषधे उपलब्ध होतील, अशी माहिती मुंबई शहर क्षयरोग अधिकारी डॉ. प्रणीता टिपरे यांनी दिली. सदर उपक्रमांमध्ये सहभागी होण्याकरिता रुग्णालयांनी करार केल्यास क्षयरुग्णांना घराजवळ उपचार सुविधा उपलब्ध होतील, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.