
मुंबई महापालिकेकडून काढण्यात आलेली घरांची लॉटरी उद्या 13 डिसेंबर रोजी काढण्यात येणार आहे. या घरांसाठी 2127 जणांनी अर्ज केले असून कोणाला घर लागते या आशेने अर्जदारांची धाकधूक वाढली आहे. पालिकेच्या वेबसाईटसह सोशल मीडिया हॅण्डलवर ही लॉटरी जाहीर केली जाईल.
विकास नियंत्रण नियमावली-2034 च्या विनियम 15 व 33 (20) (ब) अंतर्गत चार हजार चौरस मीटरपेक्षा मोठय़ा भूखंडावरील प्रकल्प राबवणाऱया विकासकांकडून पालिकेला प्रीमियमच्या बदल्यात घरे द्यावी लागतात. अशी 800 घरे पालिकेच्या ताब्यात आली आहेत. त्यातील 426 घरांची सोडत काढून विक्री करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला.
अल्प व अत्यल्प उत्पन्न गटासाठी सोडत
पालिकेकडून पहिल्यांदाच म्हाडाच्या धर्तीवर 20 नोव्हेंबला अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी सोडत काढण्याचे निश्चित करण्यात आले होते. ही घरे महागडी असतानाही शेवटच्या टप्प्यात बऱयापैकी अर्ज आले. मोक्याच्या जागी असलेल्या या घरांसाठी 2157 अर्ज आले. 20 नोव्हेंबरला सोडत काढली जाणार होती, मात्र सोडतीच्या आदल्या दिवशी तांत्रिक अडचणींमुळे सोडत पुढे ढकलण्याचे पालिकेने जाहीर केले. त्यानंतर आता 22 दिवसांनंतर ही सोडत काढली जाणार आहे.
असे आलेत अर्ज
प्रेस्टिज भायखळा 42 घरांसाठी 112 अर्ज
एलबीएस मार्ग भांडुप (प.) 240 घरांसाठी 129 अर्ज
16/ए मरोळ- अंधेरी (पू.) 14 घरांसाठी 937 अर्ज
मजासगाव, जोगेश्वरी (पू.) 46 घरांसाठी 393 अर्ज
त्रिलोक पार्क, कांदिवली (प.) 4 घरांसाठी 83 अर्ज
स्वामी विवेकानंद मार्ग, गोरेगाव (पू.) 19 घरांसाठी 189 अर्ज
कांदिवली (प.) 30 घरांसाठी 115 अर्ज
कांजूर -आदि अल्लूर 27 घरांसाठी 55 अर्ज
सागर वैभव सोसायटी, कांदिवली 4 घरांसाठी 24 अर्ज































































