
फुटपाथचे रुंदीकरण, प्रवाशांना थांबण्यासाठी जागा, गतिरोधक, प्रकाश व्यवस्था आणि दिशादर्शक फलक अशा उपाययोजनांमुळे मुंबईतील 20 ट्रफिक जंक्शनचे धोकादायक स्पॉट अपघातमुक्त होणार आहेत. यासाठी पालिकेने विशेष अपघातमुक्ती आराखडा तयार केला असून त्याची अंमलबजावणी होणार आहे.
मुंबईतील वाहतूक चौक (ट्रफिक जंक्शन) सर्व प्रकारच्या वापरकर्त्यांसाठी सुरक्षित असावेत यासाठी महानगरपालिकेने ब्लूमबर्ग फिलॅन्थ्रॉपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी या जागतिक उपक्रमातील भागीदारांच्या सहकार्याने नवीन प्रकल्प हाती घेतला आहे. या माध्यमातून मुंबई महानगरातील सर्वाधिक अपघाताची ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) सुरक्षित केली जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर अपघातप्रवण वाहतूक चौकांची पुनर्रचना केली जात आहे. याबाबतची बैठक आज पार पडली. यावेळी महानगरपालिकेचे उपआयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) मनीषकुमार पटेल यावेळी उपस्थित होते.
































































