
सामना प्रतिनिधी, मुंबई
ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मोठय़ा गृहनिर्माण सोसायटय़ांना खत प्रकल्पाची सक्ती केल्यानंतर आता पालिका प्रशासनाने सुक्या कचऱ्याच्या विल्हेवाटीकडे लक्ष केंद्रित केले आहे. रोज जमा होणाऱ्या 800 ते एक हजार मेट्रिक टन सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिकेने आता जागतिक स्तरावरील कंपन्यांना निमंत्रण दिले आहे.
डंपिंग ग्राऊंडची कचरा सामावून घेण्याची क्षमता संपल्यामुळे रोज निर्माण होणाऱया कचऱयाचे प्रमाण कमी करण्यासाठी पालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नाचा भाग म्हणून ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्यासाठी पालिकेने घरोघरी दोन डस्टबिन देऊन लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली. मोठय़ा गृहनिर्माण सोसायटय़ा व व्यावसायिक आस्थापनांना ओला कचरा आपल्याच परिसरात जिरवण्याची सक्ती करण्यात आली. खत प्रकल्प उभारण्याचे आवाहन सोसायटय़ांना करण्यात आले. त्यामुळे गेल्या वर्षभरात कचऱ्याचे प्रमाण कमी झाले.
मुंबईत रोज 7200 मेट्रिक टन कचरा तयार होतो. त्यापैकी सुमारे 800 ते 1000 मेट्रिक टन सुका कचरा असतो. या सुक्या कचऱयाची विल्हेवाट लावणे हे पालिकेसमोर आता मोठे आव्हान असून त्याकरिता जागतिक स्तरावरील कंपन्यांकडून ‘अभिरुची स्वारस्य अर्ज’ मागविण्यात आले आहेत. 20 नोव्हेंबरपर्यंत संबंधित कंपन्यांना हे अर्ज सादर करण्यात येणार आहेत.
मुंबईत दररोज निर्माण होणारा कचरा – 7200 मेट्रिक टन
निर्माण होणारा सुका कचरा – 800 ते 1000 मेट्रिक टन
डंपिंग ग्राऊंडवरची गुन्हेगारीही संपणार
कचरा नेणारा सगळा कचरा एकत्रच नेतो अशी नागरिकांची तक्रार असते. मात्र सुक्या कचऱयाची स्वतंत्र जबाबदारी दिल्यास हा प्रकार होणार नाही असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तसेच सुका कचरा विकून त्यातून पैसे मिळत असल्यामुळे डंपिंग ग्राऊंडवर कचरावेचकांची जी गुन्हेगारी कृत्ये होतात त्यालाही आळा बसेल, अशी प्रतिक्रिया अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
दिवसाला 1000 मेट्रिक टन सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया होणार
सध्या सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेकडे कोणतीही विशेष यंत्रणा नाही. घराघरातून सुका कचरा सुका कचरा वर्गीकरण केंद्रांवरून आणून तो वेगवेगळा करतात. त्यानंतर तो लोकल भंगारवाल्याला विकतात. या कचऱयावर त्यांची मालकी असते. मात्र या पद्धतीत केवळ 110 मेट्रिक सुक्या कचऱयाची विल्हेवाट दिवसाला लागू शकते. मात्र जागतिक स्तरावरील कंपनीला दररोज 1000 मेट्रिक टन सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे उद्दिष्ट दिले जाणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञान, प्रक्रिया क्षमता, अनुभव, यंत्रणा इत्यादी निकष ठेवून खासगी संस्थेची नियुक्ती करण्यात येणार आहे. नियुक्त झालेल्या संस्थेला कुलाब्यातील सुरक्षा गार्डन, देवनार, मालवणी असे तीन ठिकाणी भूखंड दिले जाणार आहेत. सुका कचरा संकलन, प्रक्रिया स्थळापर्यंत वाहन व त्यासाठी आवश्यक प्रणाली विकसित करण्याची जबाबदारी खासगी संस्थेची असेल.
summary- bmc to decompose dry waste





























































