शिवाजी पार्कजवळील भूखंडावर केलेले बांधकाम दोन आठवड्यांत हटवणार – पालिका

सामना प्रतिनिधी, मुंबई

शिवाजी पार्कजवळील मोकळय़ा भूखंडावर उभारण्यात आलेले लोखंडी बांधकाम दोन आठवडय़ांत हटविण्यात येणार असून भूखंड पूर्ववत करणार असल्याची हमी मुंबई महापालिकेने आज हायकोर्टात दिली.

शिवाजी पार्कच्या मागील बाजूस मोकळा भूखंड असून हा भूखंड सर्वसामान्यांना तसेच मुलांना खेळण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. 1991च्या विकास आराखडय़ात तशी नोंदही आहे; परंतु या ठिकाणी लोखंडी पिलर्स व जाळी लावून सदर किनाऱयाच्या दिशेने जाणाऱया मार्गावर दरवाजाही उभारण्यात आला आहे. भूखंडालगत असलेल्या पार्क क्लबच्या मागील बाजूस भिंत बांधली जात आहे. त्यामुळे हे बांधकाम हटविण्यात यावे व हा भूखंड पूर्वीप्रमाणे सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात यावा या मागणीसाठी पंकज राजमाचीकर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

या याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती एन. एम. जामदार यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी पालिकेच्या वतीने ऍड. अनिल साखरे यांनी बाजू मांडत पालिकेला सांगितले की, लवकरच या भूखंडावर करण्यात आलेले बांधकाम हटविण्यात येणार असून त्यासाठी दोन आठवडय़ांचा अवधी लागणार आहे. हायकोर्टाने हा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने याचिका निकाली काढली.