रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी लागणारे ‘कोल्डमिक्स’ पालिका बनवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील रस्त्यावर पडणारे खड्डे बुजवण्यासाठी लागणारे कोल्डमिक्स मिश्रण पालिका स्वतः तयार करणार आहे. वरळीच्या प्लाण्टमध्ये हे कोल्डमिक्स तयार केले जाणार असून प्रतिकिलोसाठी १७० रुपयांऐवजी फक्त २८ रुपये लागणार आहेत. या कोल्डमिक्सची चाचणी यशस्वी झाली असल्यामुळे पालिकेच्या या वर्षी पावसात पडणारे खड्डे बुजवण्यासाठी या ‘कोल्डमिक्स’चा वापर केला जाणार आहे.

पावसाळय़ादरम्यान पडणारे खड्डे बुजवण्यासाठी पालिकेने मागील वर्षापासून खड्डे भरण्यासाठी ‘कोल्डमिक्स’ हे अत्याधुनिक पद्धतीने तयार केलेले मिश्रण वापरण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी इस्रायलचे महागडे कोल्डमिक्स वापरण्यात आले. मात्र हे परवडणारे नसल्याने पालिकेने यंदा स्वतःच कोल्डमिक्स उत्पादित करण्यास सुरुवात केली आहे. ‘कोल्डमिक्स’चे उत्पादन महापालिकेच्या वरळी येथील ‘अस्फाल्ट प्लाण्ट’मध्येच करण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी रुपये १७० किलो या दराने ‘कोल्डमिक्स’ची खरेदी करण्यात आली होती. मात्र आता या मिश्रणाचे उत्पादन महापालिका स्वतःच करणार असल्यामुळे महापालिकेला हे ‘कोल्डमिक्स’ २८ रुपये प्रतिकिलो या दराने उपलब्ध होत असल्याची माहिती पालिकेच्या रस्ते खात्याचे प्रमुख अभियंता विनोद चिठोरे यांनी दिली.

एका वर्षात पुन्हा खड्डा पडल्यास मोफत कोल्डमिक्स
‘कोल्डमिक्स’ मिश्रण वापरून खड्डे योग्यप्रकारे भरले जावेत यासाठी महापालिकेच्या संबंधित कर्मचाऱ्यांना व कामगारांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात येत आहे. विशेष म्हणजे ‘कोल्डमिक्स’ हे मिश्रण पावसाळय़ादरम्यान वापरले जाणार असल्याने सदर चाचणी घेताना तसेच प्रशिक्षण देतानाही खड्डय़ामध्ये अगोदर पाणी भरले जाते. त्यानंतर पाणी भरलेल्या खड्डय़ात ‘कोल्डमिक्स’ मिश्रण ओतून खड्डा भरला जातो. या पद्धतीने भरलेल्या खड्डय़ांबाबत एका वर्षाची हमी संबंधित कंपनीने लेखी स्वरूपात दिली आहे. या हमीनुसार एका वर्षाच्या आत या ठिकाणीच पुन्हा खड्डा पडल्यास तो खड्डा भरण्यासाठी संबंधित कंपनीद्वारे ‘कोल्डमिक्स’ मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे.