पूरनियंत्रणासाठी जलवाहिन्यांची क्षमता वाढवणार, मार्ग बदलणे, नव्या वाहिन्या टाकणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील पूरनियंत्रणासाठी पालिका अनेक उपाययोजना करीत असून आता पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढवण्यासाठी अनेक कामे करण्यात येणार आहेत. यामध्ये वाहिन्यांची क्षमता वाढवणे, मार्ग बदलणे आणि नव्या वाहिन्या टाकण्याची कामे केली जाणार आहेत. यामध्ये दक्षिण मुंबईसाठी 90 कोटी, तर बोरिवली परिसरातील पूरनियंत्रणासाठी 97 कोटींचा खर्च केला जाणार आहे.

मुंबईत अतिवृष्टी झाल्यास अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार घडत असल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून पूरनियंत्रणासाठी ब्रिमस्ट्रोवॅडअंतर्गत मोठय़ा नाल्याचे रुंदीकरण, उच्च क्षमतेचे पंपिंग स्टेशन उभारण्यात आली आहेत. त्यामुळे मिनी पंपिंग स्टेशनसह हिंदमाता परिसरात भूमिगत टाक्या, पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये कुलाबा ते भायखळा, माझगावपर्यंत 18 ठिकाणच्या पर्जन्यवाहिन्यांचा विस्तार करणे, नव्या पर्जन्यवाहिन्या टाकणे यासाठी 15 कोटी 54 लाखांचा खर्च केला जाणार आहे, तर एफ दक्षिण लालबाग परळ, एफ उत्तर दादर पूर्वपासून शीवपर्यंत आणि जी दक्षिण वरळी प्रभादेवी पाच ठिकाणच्या पर्जन्यवाहिन्यांचा विस्तार, नव्या वाहिन्या टाकण्यासाठी 19 कोटी 38 लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या रेनॉल्ड कॉलनी कर्मचारी वसाहतीतील पर्जन्यवाहिन्यांचा विस्तार करण्यासाठी 25 कोटी 65 लाख आणि वडाळा येथील पोर्ट ट्रस्ट परिसरातील पर्जन्यवाहिन्यांचा विस्तार करण्यासाठी 19 कोटी 80 लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

बोरिवली, कांदिवलीसाठी सात कोटी

पर्जन्य जलवाहिन्यांच्या कामांमध्ये बोरिवली आणि कांदिवली परिसरातील कामेही केली जाणार आहेत. यासाठी 2 कोटी 61 लाख रुपयांचा खर्च येणार आहे, तर बोरिवली पूर्व येथील पश्चिम द्रुतगती मार्गापासून रेल्वे स्थानकापर्यंत कस्तुरबा मार्गावरील पर्जन्यवाहिन्यांची दुरुस्ती विस्तारासाठी 4 कोटी 51 लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या कामांसाठी महासभेत मंजुरीसाठी प्रस्ताव मांडण्यात आला आहे.