
बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या विविध 80 पेक्षा अधिक सेवा-सुविधांची माहिती नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअपद्वारे, 8999-22-8999 या व्हॉट्सअप क्रमांकावर अत्यंत सहजपणे उपलब्ध होणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण शुक्रवार, दिनांक 14 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले आहे. याप्रसंगी वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री असलम शेख, पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुंबईतील सर्व लोकप्रतिनिधी व मनपा पदाधिकारी, तसेच महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे आणि व्हॉटस् ॲपचे संचालक (सार्वजनिक धोरणे) शिवनाथ ठुकराल आदी मान्यवर दूरदृश्य प्रणाली (व्हिडिओ कॉन्फरन्स) द्वारे याप्रसंगी उपस्थित होते.
कोविड 19 विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सदर कार्यक्रम पूर्णतः दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडला. त्याचे प्रक्षेपण महानगरपालिकेच्या यू ट्यूब चॅनल (MyBMC My Mumbai) वर पाहता येईल. त्याची लिंक https://bit.ly/BMCWhatsAppChatBotLaunch अशी आहे. महानगरपालिकेचे ट्विटर हॅंडल @mybmc आणि फेसबूक अकाऊंट MyBmc वर देखील हे प्रक्षेपण पाहता येईल.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
• मकर संक्रांतीच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा.
• गोडव्यासाठी तिळगुळाची वाट न पहाता लोकांसाठी काम केले तर लोक आपल्याशी गोड राहतील आणि आपल्या पाठीशी राहतील, हा गोडवा अनंत काळासाठी टिकून राहील.
• आजचा सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा दिवस, म्हटले तर क्रांतीचा दिवस.
• शासकीय, प्रशासकीय कारभाराबद्दल बोलतांना तिळगुळ दिल्याशिवाय काम होत नाही असा गैरसमज आहे. परंतु त्याला छेद देणारा आजचा उपक्रम
• माझी महापालिका, माझे सरकार, त्याच्याशी माझा सुलभपणे संवाद झाला पाहिजे असे नागरिकांना नेहमी वाटते. ती सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देणारी आजची बाब.
• मत मागतांना वाकणारी, झुकलेली माणसं मत मिळाल्यानंतर ताठ होतात पण ज्यांना लोकांसाठी काम करायचे असते ती नेहमीच विनम्र असतात.
• आपली मुंबई, माझी मुंबई ही देशातील एक नंबरची महापालिका जिने जनतेला 80 हून अधिक सुविधा घरबसल्या दिल्या
• वर्क फ्रॉम होमची सुविधा या उपक्रमाने अधिक सक्षम केली
• तंत्रज्ञान वेगाने पुढे जात आहे त्याचा जनतेला अधिकाधिक उपयोग कसा करून देता येईल याचा विचार व्हावा
• सेल्युलर फोन वापरण्यामध्ये देश खुप अग्रेसर पण त्याचा जनतेला काही उपयोग करून देता येईल का, याचा विचार करायला हवा.
• तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांना होत नसेल तर त्या तंत्रज्ञानाचा काडीचा उपयोग नाही.
• मुंबई महापालिका तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वसामान्य माणसाच्या नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देत आहे
• वर्षाची सुरुवात खुप चांगली झाली. 500 चौ.फुटाच्या घरकुलावरील घरपट्टी माफ, मग कोस्टलरोडचा मावळाने पूर्ण केलेला बोगदा आणि आज मुंबईकरांना 80 सुविधा बोटाच्या टीपेवर मिळणे, ही सगळी चांगली कामे.
• जनतेच्या सेवेसाठी काम करतांना महापालिका लपवाछपवी करत नाही
• नवीन तंत्रज्ञानानुसार सुविधा अपडेट करणे मोठे काम आहे महापालिकेने त्याकडे लक्ष द्यावे
• महापालिका आयुक्तांना सुचना, महापालिका म्हणजे नेमके काय, तिचे काम काय आहे हे जनतेला समजून सांगावे, महापालिकेवरचा कामाचा ताण करणे हे नागरिकांचेही कर्तव्य आहे.
• महापालिका रोज काय काम करते, रोज गटार साफ करते, कचरा उचलते, रोज पाणी देते, धरणे बांधणे असेल ही सगळी कामे महापालिका कसे करते, घाणीत उतरून सफाई कामगार आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत असतो या सगळ्याची माहिती नागरिकांना द्यावी.
• ही माझी महापालिका आहे आणि ती देशातील सर्वात उत्तम महापालिका आहे कारण ती जगातील उत्तम तंत्रज्ञान आणि सुविधा मला उपलब्ध करून देते याचा अभिमान वाटावा असा हा क्षण.
• कोविड काळात महापालिकेचे काम कौतुकास्पद
• कौतुकासाठी काम करत नाही कर्तव्य म्हणून करतो.
• स्वत: काही करायचं नाही पण महापालिका काय करते हा प्रश्न काहीजण नेहमी उपस्थित करतात.
• माझे महापालिकेतील आणि सरकारमधील सहकारी भक्कमपणे काम करत असल्याने मी लोकप्रिय मुख्यमंत्री. त्यांची साथ असल्याने मुंबईचे कौतुक जागतिक स्तरावर. मी त्यांना नम्रपणे नमस्कार करतो. पुढच्या कोणत्याही कामासाठी जिथे सरकारच्या सहकार्याची अपेक्षा आहे ते देण्याचे मी वचन देतो.
मुंबई उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे
• आज अत्यंत आनंदाचा दिवस. मकर संक्रांतीत अपेक्षित असलेले संक्रमण आपण आज माहिती तंत्रज्ञानाचा लाभ घेत अत्यंत चांगल्या दिशेन करत आहोत ही आनंदाची बाब.
• इज ऑफ लिविंगमध्ये मुंबई जगात सर्वात पुढे राहील असा विश्वास देतो.
• महाराष्ट्रासाठी, समाजासाठी खूप काही चांगलं करण्याचा प्रयत्न आज होत आहे.
• इन्स्टा, फेसबुकचा उपयोग महाराष्ट्र पर्यटनासाठी करणार
• कोविड चॅटबॉट आपण महापालिकेत सुरू केलं. जगात अशी एक दोनच राज्ये, त्यात आपलाही समावेश
• वर्क फ्रॉम होम कल्चर सक्षम करण्याचा प्रयत्न
• पाणी पट्टी, घरपट्टी, वीज बिल भरणे असेल, महापालिकेच्या अत्यावश्यक सेवा असेल अशा अनेक 80 हून अधिक सुविधा नागरिकांना या व्हॉटसअप चॅट बॉटद्वारे देण्याचा प्रयत्न
• माय बीएमसी टिव्टर हॅन्डलवर तक्रार दाखल करण्यात येत हे पुढचे पाऊल. हा दुहेरी संवाद, अडचणीचा सर्वस्तरावर पाठपुरावा होणार.
• या द्वारे मुंबईकराचे सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न
• आज हे जगातील एकमेव उदाहरण असेल की 80 पेक्षा जास्त सुविधा आपण नागरिकांना देत आहोत
• ऑनलाईन, पारदर्शक आणि अकाऊंटेबल महापालिकेचे मॉडेल आज आपण लोकांना दिले आहे
मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख यांच्या मनोगतातील मुद्दे
• महापालिकेच्या सुविधांचा आज मुंबईकरांना घरी बसून लाभ मिळेल, याचा विशेष आनंद
• आय.टी क्षेत्रात हिंदुस्थानचे लोक जगात अग्रेसर
• दुबई पेपरलेस झाले. त्याच धर्तीवर मुंबई महापालिका दुबई प्रमाणे पेपरलेस व्हावी
• उत्तम जागतिक सुविधा मुंबईकरांना उपलब्ध करून देण्याच्या आदित्य ठाकरे यांच्या परिवर्तनशील पाऊलांचे खुप कौतूक वाटते.
• साध्या साध्या गोष्टीसाठी महापालिकेच्या कार्यालयात जाऊन चकरा मारणे या उपक्रमामुळे थांबले
• यामुळे टेंडर प्रक्रियाही अधिक पारदर्शी झाली.
• मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबई शहर अतिशय वेगाने आणि चांगल्या पद्धतीने बदलत आहे.
• कोविड काळात मुंबई पालिकेने केलले काम खुप कौतूकास्पद ज्याचे जागतिक आरोग्य संघटना असेल किंवा वर्ल्ड बँक यांनीही दखल घेतली
महापौर किशोरी पेडणेकर यांच्या भाषणातील मुद्दे
• मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा
• कोरोनाकाळात मनुष्य संपर्क विरहीत काम करतांना जन्मापासून मृत्यूपर्यंतची एकूण एक प्रमाणत्रे या व्हॉटसअॅप सुविधेद्वारे उपलब्ध होतील. मुंबईकरांना ही सुविधा उपलब्ध करून देताना खूप आनंद आणि समाधान वाटते.
• मुंबईकरांना नागरी सेवा सुविधा तत्परपणे उपलब्ध करून देण्यात महापालिका नेहमीच अग्रेसर
• संक्रमणात नवीन काही तरी शोधणे अपेक्षित त्यामुळे आजचा दिवस अतिशय औचित्यपूर्ण
• महापालिकेच्या आय.टी कक्ष, अधिकारी कर्मचारी कौतुकास पात्र
• मुख्यमंत्री नेहमीच मुंबईकरांना नवनवीन सुविधा देण्यासाठी आग्रही असतात.
• त्यातूनच कोस्टलरोडचे काम असो की आयटी सुविधा देण्याचे काम असो त्या सर्व गोष्टी सुरू राहिल्या.
• ही सेवा 24 तास उपलब्ध
• व्हॉटसअप चॅट बोटचा क्रमांकही सोपा.
डॉ. इक्बालसिंह चहल यांच्या मनोगतातील मुद्दे
• आज अतिशय चांगला उपक्रम सुरू होत आहे. मागील काही महिन्यांसाठी यासाठी खुप मेहनत घेण्यात होती. आज या सुविधेमुळे 80 पेक्षा अधिक सेवा सुविधा नागरिकांना हातातील मोबाईलवर मिळतील, काही सेकंदात नागरिकांच्या प्रश्नाचे निवारण होईल. देशातला असा हा पहिलाच उपक्रम.
• कोविड युद्ध लढताना आय.टीच्या सुविधा खूप महत्वाच्या
• नागरिकांना घरी बसून गणपती परवाना, लायसन फी, वॉर्ड नंबरची माहिती मिळणे, वॉर्ड ऑफीसरचे नाव व इतर प्रश्न त्यांना या व्हॉटसअप चॅटद्वारे सुटण्यास मदत होईल
• मागील दोन वर्षापासून कोविडशी लढतांना व्हॉटसअपची भूमिका महत्वाची. समुपदेशकांचा ग्रुप, वॉर्ड ऑफिसरचा ग्रुप, कोविड योद्ध्यांचा ग्रुप असे अनेक ग्रुप करून आपण कोविडशी नेटाने लढा दिला.
• नागरिकांना 80 सेवा सुविधांचा लाभ घरी बसून मिळणे ही निश्चित कौतुकास्पद. देशात असा उपक्रम सुरू करणारी बृहन्मुंबई महानगरपालिका पहिली महापलिका
• ही माहिती देतांना महापालिकेच्या व व्हॉटसअप टीमच्या लोकांनी अचूक व परिपूर्ण माहिती मिळेल याची काळजी घ्यावी
































































