
सामना प्रतिनिधी । मुंबई
मेट्रो कारशेडसाठी आरेच्या जमिनीवरील सुमारे 2720 झाडांची कत्तल केली जाणार आहे. पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीत तज्ञांचा अभाव असल्याने पालिकेने अद्याप याला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे वृक्ष प्राधिकरण समितीत तज्ञांची नियुक्ती करण्यासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार असून त्याबाबतची जाहिरात पाच वृत्तपत्रांमध्ये देण्यात येणार असल्याचे पालिकेच्या वतीने आज हायकोर्टात सांगण्यात आले.
कुलाबा ते सीप्झ या मेट्रो तीनसाठी मुंबईतील संवेदनशील आरेतील झाडांची कत्तल करण्यात येणार असून या वृक्षतोडीला विरोध दर्शवत विविध पर्यावरणवादी संस्थांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एन. एम. जामदार यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली. आरेतील झाडे पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या परवानगीशिवाय तोडता येत नाहीत. या समितीत तज्ञ व्यक्तींचा समावेश नसल्याने समितीला झाडे तोडण्यासंदर्भात निर्णय देण्याचा अधिकार नाही. त्यामुळे समितीत तज्ञांची नियुक्ती करण्यात येणार असून त्यासंदर्भात जाहिराती काढण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या वतीने ऍड. अनिल साखरे यांनी दिली.




























































