
सामना ऑनलाईन । मुंबई
तब्बल 14 जणांचे जीव घेणारी कमला मिलमधील आग अजूनही धुमसतेच आहे. या आगीची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नेमण्यात आलेल्या चौकशी समितीसाठी पालिकेला तब्बल 18 लाखांचा खर्च सोसावा लागणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवृत्त न्यायाधीश ए. व्ही. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीला एप्रिलपासून चार महिन्यांच्या मानधनापोटी 18 लाख 30 हजार रुपये पालिकेच्या तिजोरीतून द्यावे लागणार आहेत.
गेल्या वर्षी 29 डिसेंबरच्या मध्यरात्री कमला मिलमधील ट्रेड हाऊस इमारतीच्या गच्चीवरील वन अबव्ह आणि मोजो बिस्त्रा या पबला लागलेल्या आगीत 14 जणांचा गुदमरून मृत्यू झाला. माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी या आगीबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावेळी उच्च न्यायालयाने या आगीच्या चौकशीसाठी केरळ उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश ए. व्ही. सावंत यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत माजी नगरविकास प्रधान सचिव के. नलिनाक्षन, वास्तुविशारद वसंत ठाकूर या तीन सदस्यांची चौकशी समिती नेमली होती.
असा आहे खर्च
- के. नलिनाक्षन : दरमहा25 लाख
- वसंत ठाकूर : दरमहा25 लाख
- 1 मे 2018 ते 31 ऑगस्ट 2018 पर्यंत चार महिन्यांचा मोबदला
तसेच लिपिक आणि लघुलेखक यांचे तीन महिन्यांचे मानधन असे 18 लाख 30 हजार पालिकेच्या तिजोरीतून द्यावे लागणार आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव येत्या स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी येणार आहे. चौकशी समितीच्या कालावधीत वाढ झाल्यास दर महिन्याप्रमाणे हे मानधन वाढत जाणार आहे.
सदस्यांना सर्व सेवासुविधा
या चौकशी समितीच्या सर्व सदस्यांना कार्यालय, कॉन्फरन्स रूम, प्रवासासाठी वाहन व्यवस्था, कर्मचारी या सर्व सोयीसुविधा पालिकेने पुरवाव्या असेही आदेशात म्हटले आहे. त्यानुसार या सुविधा दिल्या जात असून या समितीसाठी एक लघुलेखक व एक लिपिक दरमहा 5000 रुपये मानधनावर दिलेले आहेत.
तिसरा अहवाल
कमला मिल या हाय प्रोफाईल आगीचे आतापर्यंत दोन अहवाल आलेले आहेत. अग्निशमन दलाने आगीचा प्राथमिक चौकशी अहवाल तयार केला होता व त्यात आगीचे कारण दिले होते. तर पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सखोल चौकशी अहवाल तयार करून तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केलेला आहे. आता उच्च न्यायालयाने नेमलेली ही चौकशी समिती आपला अहवाल 31 ऑगस्टपूर्वी न्यायालयात ठेवणार आहे. त्यामुळे या अहवालात नक्की काय असणार याकडे सगळय़ांचे लक्ष लागले आहे.
सावंत यांनी मानधन नाकारले
न्यायालयाने या समिती सदस्यांना मानधन देण्याबाबतही आदेश दिले आहेत. त्यात सावंत यांना उच्च न्यायालयातील विद्यमान मुख्य न्यायाधीशांना मिळणार्या वेतनाइतका मोबदला आणि अन्य दोन सदस्यांना आयएएस अधिकार्यांच्या वेतन श्रेणीइतका मोबदला पालिकेने द्यावा, असे आदेशही न्यायालयाने दिलेले आहेत. त्यानुसार हे मानधन दिले जाणार आहे, तर ए. व्ही. सावंत यांनी मानधन आधीच नाकारले आहे. मात्र तरीही मानधनापोटी पालिकेला 18 लाख 30 किंवा त्यापेक्षाही जास्त खर्च द्यावा लागणार आहे.



























































