
पालिकेच्या सर्व शाळा मजबूत होणार आहेत. शाळा इमारतींच्या दोन वर्षांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी पालिका सुमारे 9 कोटींचा खर्च करणार आहे. विशेष म्हणजे कंत्राटदाराने पालिकेने अंदाजित केलेल्या दरापेक्षा तब्बल 18 ते 32 टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दर्शवली आहे.
पालिकेच्या सहा परिमंडळानुसार शाळांच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी निविदा मागवल्या होत्या. 2018 च्या दरानुसार पालिकेने अंदाजपत्रक तयार केले होते. गेल्या तीन वर्षांत प्रत्येक गोष्टीचे दर वाढलेले असताना कंत्राटदारांनी पालिकेच्या 2018 च्या दरानुसार आधारित अंदाजपत्रकापेक्षा कमी दराने निविदा भरून हे काम करण्याची तयारी कंत्राटदारांनी दर्शवली आहे. स्थायी समितीच्या बैठकीत याबबतच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.
अशी कामे होणार
पालिकेच्या सात परिमंडळांत मिळून शाळांच्या 467 इमारती आहेत. त्यातील सहा परिमंडळांतील शाळांच्या इमारतींची दुरुस्ती होणार आहे. या तातडीच्या संरचनात्मक दुरुस्ती, शाळांच्या इमारतींमधील किरकोळ दुरुस्ती, तातडीचे सुतारकाम, विद्युत आणि दिव्यांची दुरुस्ती, पावसाळ्यापूर्वीची आवश्यक कामे केली जाणार आहेत.































































