
फोर्ट येथील इमारत दुर्घटनेमुळे मुंबईतील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असताना मुंबई महानगरपालिका क्षेत्रात तब्बल 443 अतिधोकादायक इमारती असल्याचे समोर आले आहे. यामध्ये खासगी आणि पालिकेच्या अखत्यारीतील इमारतींचा समावेश आहेत. पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. यामध्ये 52 इमारती पालिकेच्या मालकीच्या असून सर्वाधिक धोकादायक इमारती घाटकोपर परिसरात आहेत. गेल्यावर्षी धोकादायक इमारतींची संख्या 499 होती. याशिवाय मुंबईत उपकरप्राप्त 16 हजारांवर इमारती धोकादायक आहेत.
पालिकेच्या माध्यमातून दरवर्षी पावसाळ्याआधी धोकादायक इमारतींची यादी जाहीर करून संबंधित इमारतीत रहिवासी असल्यास ती तातडीने रिकामी करण्याचे निर्देश दिले जातात. मात्र पुनर्वसनाची नसलेली खात्री आणि पर्याय नसल्याने रहिवासी घर रिकामे करीत नाहीत. तर काही वेळा न्यायालयात प्रकरण असल्याने पालिकेला कारवाई करता येत नाही. मात्र अतिवृष्टीमुळे अनेक वेळा दुर्घटना घडल्यास हा प्रश्न ऐरणीवर येतो. पालिकेकडून शहर व उपनगरातील सर्व खाजगी व पालिकेच्या मालकीच्या इमारतींचे सर्वेक्षण केले जाते. त्यात ज्या इमारती तत्काळ पाडून टाकणे आवश्यक आहे अशा इमारती सी-1 या प्रकारात अर्थात अतिधोकादायक म्हणून गणल्या जातात. अशा अत्यंत धोकादायक 443 इमारती मुंबईत आहेत. दोन वर्षांपूर्वी तब्बल 619 अतिधोकादायक इमारती आढळून आल्या होत्या. गेल्यावर्षी ही संख्या 499 झाली होती. धोकादायक इमारतींपैकी काही इमारती पाडून टाकण्यात आल्या. तर काही इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. काही इमारतींवरील कारवाईला न्यायालयाने स्थगिती आदेश दिल्याने पालिकेने कारवाई केलेली नाही.
या ठिकाणी आहेत धोकादायक इमारती
एन विभागात (घाटकोपर) 52
एच वेस्ट (वांद्रे पश्चिम) 51
टी (मुलुंड) 49
के/पश्चिम (अंधेरी व जोगेश्वरी पश्चिम) 37
के पूर्व – अंधेरी व जोगेश्वरी पूर्व 31
पी उत्तर – (मालाड) 28
एच इस्ट – (वांद्रे पूर्व) 27


























































