पालिका कर्मचार्‍यांना 26 हजार रुपयांचा बोनस, आदित्य ठाकरे यांच्या ट्विटनंतर सरकारला जाग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांना यावर्षी 26 हजार रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. ही वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत 3500 इतकी आहे. दरम्यान, दिवाळी दोन दिवसांवर आली असताना बोनस जाहीर झाला नसल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून सरकारच्या ढिलाईचा चांगलाच समाचार घेत कानउघाडणी केली होती. मुंबईकरांना नागरी सुविधा देण्यासाठी प्रामाणिकपणे अहोरात्र झटणार्‍या कर्मचार्‍यांना हक्काचा बोनस ‘खोके सरकार’ दिवाळी झाल्यानंतर देणार का, असा खडा सवालही त्यांनी आज केला होता.

महापालिकेत काम करणार्‍या सुमारे एक लाख दोन हजार कर्मचार्‍यांना याचा फायदा होणार आहे. दिवाळी दोन दिवसांवर आली असताना पालिकेकडून बोनस देण्यासंदर्भात कोणताही निर्णय जाहीर झाला नसल्याने कर्मचार्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत होता. बोनसबाबत पालिका आयुक्तांकडूनही कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिका कर्मचारी कामगार कृती समन्वय समितीकडूनही पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांना बोनसचा निर्णय घेण्यासाठी वेळ मिळत नसल्यामुळेच बोनस रखडल्याची जोरदार चर्चा पालिका कर्मचार्‍यांमध्ये सुरू होती. या पार्श्वभूमीवर दिवाळी दोन दिवसांवर आल्यामुळे कर्मचारी कामगार समन्वय समितीनेदेखील आज पालिका आयुक्तांची भेट घेऊन पालिका कर्मचार्‍यांना ३० हजार रुपये बोनस द्यावा, अशी मागणी केली होती. यावेळी आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीत अंतिम निर्णय जाहीर होईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले होते, अशी माहिती समन्वय समितीचे अध्यक्ष बाबा कदम यांनी दिली. यानुसार आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रदीर्घ बैठकीनंतर पालिका कर्मचार्‍यांना २६ हजार रुपये बोनस (सानुग्रह अनुदान) जाहीर करण्यात आल्याची माहिती समन्वय समितीकडून देण्यात आली.

इन्कम टॅक्स कापणार नाही

– कर्मचार्‍यांना 26000 रुपये बोनस देण्यात आला तरी यामधून इन्कम टॅक्स कापला जाणार नाही.
– आरोग्य सेविकांना 11 हजार रुपये बोनस मिळणार. गेल्या वर्षी 9 हजार रुपये मिळाले होते.
– आरोग्य सेविकांना एक पगार किंवा 3500 अधिक 5 लाखाची गटविमा पॉलिसी जानेवारी 2024 पासून सुरू होणार.

पालिकेवर 265 कोटींचा भार

– जाहीर करण्यात आल्यानुसार पालिकेच्या एक लाख दोन हजार कर्मचार्‍यांना याचा फायदा होणार आहे. यामुळे पालिकेच्या तिजोरीवर मात्र सुमारे 265 कोटींचा भार पडणार आहे.