बांगलादेशात २० वर्षांनंतर BNP चा विजय; पंतप्रधानपदासाठी तारिक रहमान यांचं नाव जवळपास निश्चित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बांगलादेशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून तब्बल २० वर्षांनंतर बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाने (BNP) सार्वत्रिक निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र आणि बीएनपीचे अध्यक्ष तारिक रहमान यांचा पंतप्रधान होण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून, त्यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे.

जुलै २०२४ मधील जनआंदोलनानंतर शेख हसीना यांचे सरकार कोसळले होते. त्यानंतर झालेल्या या पहिल्याच निवडणुकीत बीएनपीने ३०० पैकी २०० हून अधिक जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. बीएनपी युतीने २१२ जागांवर विजय मिळवला असून, कट्टरपंथी जमात-ए-इस्लामीला केवळ ७७ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

तारिक रहमान यांचा १७ वर्षांचा वनवास संपला

तारिक रहमान हे गेल्या १७ वर्षांपासून लंडनमध्ये निर्वासित जीवन जगत होते. भ्रष्टाचार आणि अन्य आरोपांमुळे त्यांना देश सोडावा लागला होता. मात्र, नुकत्याच झालेल्या राजकीय परिवर्तनानंतर ते स्वदेशी परतले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने हा ऐतिहासिक विजय मिळवला. तारिक रहमान यांनी स्वतः दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवली होती आणि दोन्ही ठिकाणी त्यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे.