
सामना प्रतिनिधी, मुंबई
सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्या सांताक्रुझ येथील निवासस्थानी सुरक्षेसाठी तैनात केलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला (सीआयएसएफ)च्या जवानाने आज सकाळी सर्व्हिस रायफलमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली. भवंरलाल नायक (42) असे त्या जवानाचे नाव असून त्याने आत्महत्या का केली ते मात्र समजू शकले नाही.
तिस्ता सेटलवाड यांच्या निवासस्थानी सुरक्षेसाठी नेमणूक केल्यानंतर शुक्रवारीच भवंरलाल नायक कामावर रुजू झाला होता. तो जुहू समुद्राच्या दिशेने असलेल्या बंगल्याच्या दिशेला तैनात होता. आज सकाळी 11.30 च्या सुमारास सोबत कोणी नसताना नायक याने एके 47 या रायफलमधून हनुवटीमध्ये गोळी मारून घेतली. गोळी डोक्यात आरपार गेल्याने नायक यांचा जागीच मृत्यू झाला. मूळचा राजस्थानचा असलेल्या नायकने आत्महत्या का केली त्याचा सांताप्रुझ पोलीस तपास करीत आहेत.

























































