बापर्डे येथील घरातून बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह व्हाळाच्या पाण्यात सापडला

15 दिवसांपूर्वी बापर्डे येथील घरातून बेपत्ता झालेल्या प्रतिभा प्रकाश दुसणकर (55) या महिलेचा मृतदेह रविवारी सकाळी बापर्डे डेकांबा येथील व्हाळाच्या पाण्यात सापडला. या महिलेची मन:स्थिती बिघडलेली होती. याच अवस्थेत असताना 22 जुलै रोजी सकाळी 7.30 वा.सुमारास ती घरातून निघून गेली. तिचा मुलगा बाळकृष्ण याने तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र प्रतिभा दुसणकर यांचा कुठेच शोध लागला नाही.

अखेर बाळकृष्ण याने देवगड पोलीस स्थानकात आई बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. रविवारी सकाळी बाळकृष्ण आईचा शोध घेत असताना बापर्डे डेकांबा व्हाळाकडे त्यांना कुजलेला दुर्गंध येऊ लागल्याने त्यांनी पाण्याच्या दिशेन शोध घेतला. तेव्हा त्यांना पाण्यात सडलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह सापडला.

मृतदेह बेपत्ता आईचाच असल्याची ओळख पटली असून याबाबत देवगड पोलीस स्थानकात कळविल्यानंतर पोलीस हवालदार राजन जाधव आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाण्यात आढळलेला मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढला. पंचनामा करून शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.