स्वस्तात विमान तिकीट काढून देण्याच्या नावाने फसवाफसवी ; आर्थिक लूट करणाऱया बोगस कॉल सेंटरचा कारभार उधळला

स्वस्तात विमान प्रवास करा, अशी समाज माध्यमांवर जाहिरातबाजी करून देश-विदेशातील नागरिकांना पद्धतशीर आर्थिक चुना लावणाऱया एका बोगस कॅल सेंटरच्या फसवेगिरीचा कारभार मुंबई गुन्हे शाखेने उधळून लावला आहे. युनिट- 8 च्या पथकाने स्वस्तात विमान तिकीट काढून देण्याच्या नावाखाली लोकांना चुना लावणाऱया 13 जणांना अटक केली आहे.

अंधेरीच्या हसन पाडा मार्गावरील मित्तल कमर्शिया इमारतीत एक बोगस कॉल सेंटर थाटून स्वस्तात विमान तिकीट देण्याच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक केली जात असल्याची माहिती युनिट-8 चे प्रभारी निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांना मिळाली. त्यानंतर सहाय्यक आयुक्त महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली साळुंखे, सपोनि मधुकर धुतराज, मनोजकुमार प्रजापती, राहुल प्रभू, तसेच शिरसाट, चव्हाण, यादव, सिंह, कुरकुटे, कांबळे, गायकवाड, भिताडे व पथकाने बोगस कॉल सेंटरची अधिक माहिती काढली. तेव्हा त्या कॉल सेंटरच्या माध्यमातून समाजमाध्यमांवर स्वस्तात विमान तिकीट उपलब्ध करून देऊ अशी जाहिरातबाजी करतात. जाहिरातीवर क्लिक करून तिकीट घेण्यास इच्छुक असणाऱयांना वैयक्तिक माहिती भरण्यास सांगितले जाते. मग त्यानंतर संबंधितास इंटरनेट अथवा व्हॉट्सअप कॉलद्वारे संपर्क साधला जातो. मग हे भामटे बनावट तिकीट दाखवून अथवा बुक केलेले तिकीट होल्डवर असल्याचे भासवून संबंधितांकडून पैसे घ्यायचे.

  जाहिरातीसाठी गुगलला दोन कोटी 

स्वस्तात विमान तिकीट मिळवून देणार अशी जाहिरातबाजी करण्यासाठी आरोपींनी गुगलकडे दोन कोटी रुपये भरले होते. बनावट तिकीट बनविण्यासाठी हे भामटे एका सॉफ्टवेअरचा वापर करत होते. शिवाय अटक आरोपींपैकी काही जण दिल्लीचे असून या भामटय़ांनी चार-पाच महिन्यांपासून मुंबईत बोगस कॉलसेंटर थाटले होते. याआधी त्यांनी दिल्ली आणि गोवा येथेदेखील अशाप्रकारे बनवाबनवी केली असल्याचे समजते.

  कॅनडातील नागरिक मुख्य टार्गेट

विमान प्रवास करणाऱया  देश-विदेशातील नागरिकांना स्वस्तात तिकीट काढून देण्याचे आमिष हे आरोपी दाखवायचे. विशेषकरून कॅनडातील नागरिकांना ते फसविण्यासाठी सर्वाधिक लक्ष्य करायचे, असे प्राथमिक तपासातून समोर आल्याचे उपायुक्त रोशन यांनी सांगितले.