सीबीआय अधिकाऱ्यांची खंडणीसाठी बोगस छापेमारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सीबीआयच्या अधिकाऱयांनी खंडणी उकळण्यासाठी आयटी कंपनीवर बोगस छापेमारी केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात चंदिगड पोलिसांनी सीबीआयच्या चार अधिकाऱयांना अटक केली आहे. या कारवाईने सीबीआयची नाचक्की होताच तपास यंत्रणेचे संचालक सुबोध कुमार जैसवाल यांनी चौघांनाही सेवेतून बडतर्फ केले आहे. सुमित गुप्ता, प्रदीप राणा, अंकुर कुमार व आकाश अहलावाट अशी अटक केलेल्या उपनिरीक्षकांची नावे आहेत. हे चौघे सीबीआयच्या दिल्ली युनिट कार्यालयात कार्यरत होते.

डय़ुटी नसतानाही त्यांनी चंदिगड गाठले आणि आयटी कंपनीवर छापा टाकला. तेथील कर्मचाऱयांना संशय येताच त्यांनी पोलिसांना बोलावले. त्यावेळी सीबीआय अधिकाऱयांनी खंडणी वसुलीसाठी बोगस छापेमारी केल्याचा भंडाफोड झाला. अधिकाऱयांनी कंपनी मालकाला बळजबरीने कारमध्ये बसवले आणि अटकेची धमकी देऊन 25 लाख रुपये मागितल्याचा आरोप आहे. चंदिगड पोलिसांनी चारही आरोपी अधिकाऱयांना अटक केली. त्यानंतर सीबीआय संचालक जैसवाल यांनी चौघांना सेवेतून बडतर्फ केले.