Happy Birthday Amitabh Bacchan अभिनयाचे वैश्विक विद्यापीठ, बिग-बी @ 80

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ह प्रा. अनिल कवठेकर

शेक्सपियरने म्हटलेलं आहे की, नावात काय असतं! पण खरं तर काही नावांत आकाशासारखी भव्यता असते, चंद्रासारखी शीतलता असते, सागराच्या तळासारखी गहनताही असते. ‘अमिताभ’ हे असेच अर्थपूर्ण नाव आहे.

महात्मा गौतम बुद्धांच्या अनेक नावांपैकी ‘अमिताभ’ एक नाव आहे. त्याचा अर्थ असा होतो की, अमित जे कधीही मिटलं जाणार नाही. ताप म्हणजे तेज. ज्याच्या ज्ञानाचे तेज कधीही मिटलं जाणार नाही, तो म्हणजे महात्मा बुद्ध आणि ज्याच्या अभिनयाचं तेज हे कधीही मिटलं जाणार नाही, तो म्हणजे अमिताभ होय. आपण धारण केलेल्या नावाला शंभर टक्के न्याय देणारा नायक, ‘स्टार ऑफ द मिलेनियम’ म्हणजे अमिताभ बच्चन होय.

हे सगळे यश अमिताभला इतक्या सहज मिळालेले आहे का? तर त्याचे उत्तर आहे, नाही. ज्या अमिताभच्या आवाजावर आपण सगळे प्रेम करतो, त्या आवाजाला अलाहाबाद रेडिओ स्टेशनवर बेसूर आवाज, जाडाभरडा आवाज म्हणून रिजेक्ट करण्यात आले होते. अमिताभच्या ज्या उंचीवर आपण प्रेम करतो, त्या उंचीला किती लांबडा माणूस आहे म्हणून नावे ठेवली गेली होती. त्याच्या लांबट चेहऱयाला नावे ठेवली गेली होती. हे अपमानाचे विष पचवून अमिताभने आपल्या शंभर नंबरी अभिनयाच्या सामर्थ्याने स्वतःला अभिनयाच्या क्षेत्रामध्ये सिद्ध करून हे यश मिळवलेले आहे.

अमिताभ हे एका संघर्षाशी सातत्याने लढा देणाऱया व्यक्तीचे नाव आहे. अभिनयातील नवरसांना कोळून प्यालेल्या नटसम्राटाचे नाव आहे. अमिताभ हे प्रत्येक अभिनेत्याच्या स्वप्नाचे नाव आहे.

अमिताभ म्हणजे 80 च्या कालखंडातील सर्वात जास्त मानधन घेणारा स्टार होता आणि तेवढं मानधन देणं हे निर्मात्याला परवडत होतं. कारण अमिताभचा सिनेमा म्हणजे बॉक्स ऑफिसवर हमखास कमाई करणारा सिनेमा अशी व्याख्या तयार झालेली होती आणि एकदा चित्रपटात अमिताभला घेतल्यानंतर तुम्हाला कॉमेडियन घेण्याची गरज नाही. कारण अमिताभ स्वगतही बोलायचा, कॉमेडीही करायचा, दारुडाही रंगवायचा, रोमँटिक हिरोही व्हायचा, ऍक्शन हिरोही व्हायचा, ‘मेरे पास आओ मेरे दोस्तो’ असे म्हणून मुलांना कथाही सांगायचा, ट्रजेडी किंगही व्हायचा. या सर्वांचं एकत्रित पॅकेज देणे कोणत्याही निर्मात्याला सहज परवडत होतं. कारण अमिताभ म्हणजे हमखास यश. असा रंजक प्रवास आहे अमिताभ बच्चन नावाच्या अभिनयाच्या परिसाचा.

कोणत्याही नायकाच्या आयुष्यात सुपरस्टार होण्याची प्रक्रिया सुरू होण्यासाठी एक असा चित्रपट यावा लागतो की, त्याआधी तसा चित्रपट आलेला नसावा आणि ते भाग्य फार कमी नायकांच्या वाटय़ाला येतं किंवा असे म्हणता येईल की, आपल्या अभिनयाने भूमिकेत प्राण फुंकून काही नायक भविष्याच्या कप्प्यातून आपल्या वाटेचे भाग्य खेचून आणतात आणि अमिताभने ‘दीवार’ या चित्रपटात तसे केलेले आहे असे मला वाटते. कारण ‘दीवार’मध्ये आलेल्या नायकासारखा नायक याआधी आलेला नाही.

तसे पाहिले तर हाणामारीच्या चित्रपटांमध्ये नायक व्हिलनच्या अड्डय़ावर जाऊन शेवटी धुमाकूळ करायचा, पण ‘दीवार’ हा पहिला चित्रपट आहे, जिथे नायक गुंडांच्या आधी त्यांच्या अड्डय़ावर जाऊन ते येण्याची वाट पाहत निवांत बसलेला आहे आणि ते आल्यावर त्यांना प्रचंड आत्मविश्वासाने ठणकावून सांगतो की, ‘‘तुम लोग मुझे ढूंढ रहे हो और मैं तुम्हारा या इंतजार कर रहा हूं.’’ शिवाय त्यांच्या त्या अड्डय़ाच्या दरवाजाला आरामात कडी लावून कुलूप लावतो आणि वर त्यांना पुन्हा सांगतो, ‘‘इसे अपनी जेब मे रखले पीटर. अब ये ताला मैं तेरे जेब से चाबी निकाल कर ही खोलूंगा.’’ म्हणजे याअगोदर नायकांनी अनेक गुंडांना लोळवलेले आहे, पण ‘दीवार’मधला अमिताभ ज्या पद्धतीने त्यांच्या अड्डय़ाची कडी लावून, कुलूप लावून त्यांना ठणकावून सांगतोय आणि मग जी हाणामारी करतोय हे सगळं जे होतं ते पहिल्यांदाच आलं होतं आणि वेगळं होतं, शिवाय अमिताभच्या स्टाईलमध्ये होतं. ती स्टाईलसुद्धा प्रेक्षकांकरिता नवीन होती. अमिताभने त्यात जीव ओतून जी काही ऍक्शन केलेली आहे, तो सगळाच भाग प्रेक्षकांकरिता खूप वेगळा होता. जणू त्याची ते अनेक वर्षांपासून वाट पाहत होते.
अमिताभने या चित्रपटाला आपला वेगळा टच दिलेला होता. हा संवाद म्हणत असताना त्याचं उभं राहणं, त्याच्या आत्मविश्वासाने भरलेल्या डोळ्यांतून जाणवणारी त्याची जरब, आवाजातील राकटपणा हे पाहताना प्रेक्षकांना खात्री पटते की, हा नायक सात-आठ गुंडांना आता सहज लोळवणार. म्हणजे नायकांनी आठ-दहा गुंडांशी हाणामारी करणे हे काही नवे तंत्र नाही, पण ती हाणामारी होण्याआधी नायकाची भव्य उंची प्रेक्षकाच्या मनात निर्माण व्हायला हवी. ती निर्माण करण्याचे काम अमिताभने केले. खरं तर यात त्याचा हातखंडा आहे.

जसे मयुराला नृत्य शिकवायला लागत नाही, कोकिळेला गायला शिकवावे लागत नाही, तसे अमिताभ बच्चनला अभिनय कसा करावा हे सांगावे लागत नाही. तो असा अभिनेता आहे की, जो एकच दृश्य तीन ते चार प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने संवाद घेऊन देऊ शकतो आणि दिग्दर्शकाला एडिटिंग करताना प्रश्न पडतो, यातले नेमके कोणते दृश्य घ्यावे? कारण त्याचे प्रत्येक दृश्य हे अप्रतिम सौंदर्याने, त्याच्या अप्रतिम अभिनयाने नटलेले असते, अमिताभच्या परिसस्पर्शाने झगझगीत झालेले असते. चित्रपटाला चित्राची भाषा असल्यामुळे संवाद अगदी छोटे छोटे असावेत असा नियम आहे, पण या चित्रपटाने तो नियम मोडला. अनेक दृश्यांमध्ये अमिताभ कथा सांगत असतो, इतके मोठे त्याचे संवाद आहेत. हासुद्धा एक वेगळेपणा या चित्रपटात होता आणि तोसुद्धा लोकांना भावला. कारण तो अमिताभच्या आवाजातून आलेला होता. त्याच्या आवाजाला दुसऱयाच्या अंतःकरणापर्यंत पोहोचण्याचा वर प्राप्त झालेला आहे.

चित्रपटात नास्तिक असणारा नायक आपल्या आईवरच्या प्रेमासाठी आयुष्यभर जपलेले नास्तिकतेचे तत्त्व झुगारून देवाशी भांडण करतो हेसुद्धा खूप वेगळं होतं आणि हे भांडणसुद्धा अमिताभ बच्चनने एका टेकमध्ये दिलेले आहे. कारण ते फक्त अमिताभच करू शकतो.

या चित्रपटाने अमिताभच्या यशाच्या मार्गात जी अपयशाची भिंत होती, ती उद्ध्वस्त करून टाकली आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य करणारा एक नवा नायक, अँग्री अँड मॅन आपल्याला मिळाला, पण अमिताभने थांबू नये असं या देशातील प्रत्येक चित्ररसिकाला वाटतं. प्रत्येकाला वाटतं की, अमिताभने आता ऑस्करसाठी काम करावं किंवा असा चित्रपट स्वीकारावा की, त्यात तो ऑस्करपर्यंत पोहोचेल. आपण सगळे जण त्याला ऑस्कर प्राप्त व्हावा याची वाट पाहत आहोत. अमिताभला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!