चेक बाऊन्स प्रकरण : अभिनेता राजपाल यादवच्या जामिनावर आज दिल्ली उच्च न्यायालयात फैसला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता राजपाल यादव सध्या एका जुन्या चेक बाऊंस प्रकरणामुळे तिहार कारागृहात शिक्षा भोगत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या कायदेशीर लढाईत आता सर्वांचे लक्ष दिल्ली उच्च न्यायालयाकडे लागले आहे. राजपाल यादवने आपल्या भाचीच्या लग्नासाठी जामिनाची याचिका दाखल केली असून, त्यावर आज दिल्ली न्यायालय आपला निर्णय देणार आहे.

राजपाल यादवच्या भाचीचे लग्न 19 फेब्रुवारी रोजी शहाजहानपूर येथे होणार आहे. या कौटुंबिक सोहळ्यात सहभागी होता यावे, यासाठी त्याने जामिनाची विनंती केली होती. यापूर्वी 12 फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्याला कोणताही दिलासा न देता याचिका फेटाळून लावली होती. मात्र, आज होणाऱ्या सुनावणीत न्यायालय काय भूमिका घेते, याकडे सिनेसृष्टीसह त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

हे संपूर्ण प्रकरण 2010 मध्ये ‘अता पता लापता’ या सिनेमाशी संबंधित आहे. या सिनेमाद्वारे राजपाल यादवने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते. या सिनेमाच्या निर्मितीसाठी त्याने ‘मेसर्स मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड’कडून 5 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. दुर्दैवाने हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल फ्लॉप ठरला, ज्यामुळे राजपाल यादवची आर्थिक गणिते बिघडली. कर्जाची परतफेड वेळेत न झाल्यामुळे त्याने दिलेले चेक बाऊंस झाले. परिणामी, संबंधित कंपनीने त्याच्याविरोधात ‘नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट’च्या कलम 138 अंतर्गत खटला दाखल केला.

दिल्ली उच्च न्यायालयाने राजपाल यादवला थकीत कर्ज फेडण्यासाठी अनेकदा संधी दिली होती. मात्र, वारंवार सूचना देऊनही तो कर्जाची रक्कम जमा करू शकला नाही. अखेर न्यायालयाने कडक पवित्रा घेत त्याला नोटीस बजावली आणि 4 फेब्रुवारी रोजी शरण येण्याचे आदेश दिले. तेव्हापासून तो तिहार कारागृहात असून आता जामिनासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत.