अभिनेते सतीश शाह यांचे निधन, बॉलीवूडवर शोककळा

‘साराभाई वर्सेस साराभाई’ मालिका असो किंवा ‘जाने भी दो यारो’, ‘मैं हूँ ना’ यासारख्या चित्रपटांमधून कॉमेडीच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे आज दुपारी निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते किडनीच्या विकाराने त्रस्त होते. सतीश शाह यांच्या निधनामुळे बॉलीवूडवर शोककळा पसरली असून इंडस्ट्रीने एक हरहुन्नरी कलाकार गमावला, अशा शब्दांत कलाकारांनी हळहळ व्यक्त केली.

अभिनेते सतीश शाह यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा देताना निर्माते-दिग्दर्शक अशोक पंडित म्हणाले, माझे जवळचे मित्र, उत्तम कलाकार सतीश शाह यांचे आज दुपारी निधन झाले. किडनी निकामी झाल्यामुळे घरातच त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना उपचारासाठी हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आले. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. वांद्रे येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. उद्या, रविवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. सतीश शाह यांच्या जाण्यामुळे इंडस्ट्रीचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.

उत्तम सहकलाकार, जवळचा मित्र गमावला

सतीश शाह यांच्या निधनामुळे उत्तम सहकलाकार आणि माझा अत्यंत जवळचा मित्र गमावला, अशा शब्दांत अभिनेते जॉनी लिव्हर यांनी श्रद्धांजली वाहिली. गेल्या चाळीस वर्षांपासून आमच्यात घट्ट मैत्री होती. दोनच दिवसांपूर्वी आमच्यात बोलणे झाले होते. ते आता आपल्यात नाहीत, या बातमीवर विश्वास ठेवणे खूप कठीण आहे. मालिका आणि चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान कुणीही विसरू शकणार नाही. मला आणि संपूर्ण इंडस्ट्रीला त्यांची खूप आठवण येईल.

लहानपणापासून अभिनयाची आवड

सतीश शाह हे शाळा आणि कॉलेजमध्ये असल्यापासून नाट्य स्पर्धेत भाग घेत. 1970 साली आलेल्या ‘भगवान परशुराम’ चित्रपटापासून त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. 1972 मध्ये त्यांनी डिझायनर मधू शाह यांच्याशी लग्न केले.

एकाच मालिकेत 55 भूमिका

सतीश शाह यांनी ‘ये जो जिंदगी’ या मालिकेत त्यांनी तब्बल 55 हून अधिक पात्रे साकारली. त्यानंतर ते ‘फिल्मी चक्कर’, ‘घर जमाई’, ‘टॉप 10’, ‘साराभाई विरुद्ध साराभाई’ आणि ‘कॉमेडी सर्कस’सारख्या शोमध्ये दिसले.

मराठी चित्रपटांतही साकारल्या भूमिका

सतीश यांचे दोन गाजलेले मराठी सिनेमे म्हणजे ‘गंमत जंमत’ आणि ‘वाजवा रे वाजवा.’ सचिन पिळगावकर यांच्या ‘गंमत जंमत’ या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटात त्यांनी इन्स्पेक्टर फुटाणेची भूमिका साकारली होती, तर ‘वाजवा रे वाजवा’ या चित्रपटात त्यांनी बाबूलाल जैन नावाच्या खलनायकाची भूमिका साकारली होती.

‘जाने भी दो यारो’ ठरला टर्निंग पॉइंट

सतीश शाह यांचा ‘जाने भी दो यारो’ हा कल्ट क्लासिक बॉलीवूड चित्रपट कोणीही विसरू शकत नाही. या चित्रपटात त्यांनी ऑफिसर डिमेलो ही भूमिका साकारली होती. चित्रपटात काही वेळाने त्या पात्राचा मृत्यू होतो, पण संपूर्ण डेड बॉडी चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावते. सतीश शाह यांनी कोणत्याही एक्सप्रेशन्सशिवाय प्रेक्षकांना लोटपोट होईपर्यंत हसवले होते. ‘आगे की सोच’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘हम साथ साथ है’, ‘हम आपके है कौन’, ‘जुडवा’, ‘ओम शांती ओम’, ‘रा वन’, ‘मुझसे शादी करोगी’, ‘कहो ना प्यार है’ अशा अनेक चित्रपटांत त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. ‘हमशकल्स’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.