‘धुरंधर’ ने बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ, चार दिवसात 100 कोटींचा आकडा पार

‘धुरंधर’ हा स्पाय थ्रिलर सध्याच्या घडीला चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी त्याने अपेक्षापेक्षा जास्त कमाई केल्याने, सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. रणवीर सिंगच्या कारकिर्दीतील हा सर्वात मोठा ओपनर चित्रपट ठरला आहे. मुख्य म्हणजे या वर्षातील ‘सैयारा’ ला मागे टाकत वर्षातील तिसरा सर्वाधिक ओपनिंग चित्रपट देखील बनला आहे. दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने आपली दमदार कमाई सुरू ठेवली आहे. अवघ्या चार दिवसात या चित्रपटाने 100 कोटींची कमाई चुटकीसरशी केली आहे.

आदित्य धर यांनी विकी कौशलचा “उरी: द सर्जिकल स्ट्राईक” हा चित्रपट दिग्दर्शित केला. त्या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर सहा वर्षांनी आदित्य धर “धुरंधर” चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात परतले आहेत. त्यांचा हा चित्रपट हिंदुस्थानातील गुप्तचर संस्थेच्या, रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (RW) च्या गुप्त ऑपरेशनवर आधारित आहे.

या चित्रपटात रणवीर सिंग, अक्षय खन्ना, आर. माधवन, राकेश बेदी, सारा अर्जुन, संजय दत्त आणि अर्जुन रामपाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दमदार कलाकार, कथानक आणि लोकप्रिय संगीत यामुळे ‘धुरंधर’ हा चित्रपट या वर्षातील आतापर्यंतच्या सर्वात अपेक्षित रिलीजपैकी एक बनला आहे. मनोरंजक बाब म्हणजे, दमदार सुरुवातीनंतर, ‘धुरंधर’ ने त्याच्या पहिल्या रविवारी चांगलीच कमाई केली आहे. चित्रपटाच्या प्रभावी कामगिरीने व्यापार विश्लेषक देखील आश्चर्यचकित झाले आहेत.

या सगळ्यात, धुरंधरने रिलीजच्या पहिल्या दिवशी 28 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी, चित्रपटाने 32 कोटींची कमाई केली आहे. सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘धुरंधर’ने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी 39.50 कोटी रुपये कमावले आहेत. यासह, ‘धुरंधर’ची तीन दिवसांत एकूण कमाई आता 99.50 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. सोमवारी हा चित्रपट 100 कोटींचा आकडा नक्कीच पार करणार.

‘धुरंधर’ हा त्याच्या पहिल्या रविवारी 39.50 कोटी कमाई करून 16 वा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. त्याने रेस ३, बजरंगी भाईजान आणि पीके सारख्या चित्रपटांना मागे टाकले आहे.