लखनौमध्ये दिवसाढवळय़ा वकिलांवर बॉम्ब फेकला ,हायकोर्टाच्या बाररूममध्ये स्फोट

382

गावठी बॉम्बच्या स्फोटाने उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ गुरुवारी सकाळी हादरली. आश्चर्य म्हणजे हा स्फोट येथील वजीरगंज कोर्टातील बाररूममध्ये झाला असून यात तीन वकील जखमी झाले आहेत. स्फोटानंतर पोलिसांना याच परिसरात आणखी दोन जिवंत बॉम्बही आढळून आले.

एकाच बॉम्बच्या स्फोटाने कोर्टाच्या आवारात हाहाकार माजला. तेथील लोक वाट फुटेल तेथे पळायला लागले. हा गावठी बॉम्ब आपल्याला लक्ष्य करून फेकण्यात आल्याचे लखनौ बार असोसिएशनचे पदाधिकारी ऍड. संजीव लोधी यांनी सांगितले. स्फोटात लोधी हेसुद्धा जखमी झाले आहेत. दहा जणांच्या एका गटाने लोधी यांच्या चेंबरमध्ये घुसून गावठी बॉम्ब फेकला.

बॉम्ब फेकणाराही वकीलच

आरोपींनी तीन बॉम्ब फेकले. त्यातल्या एकाच बॉम्बचा स्फोट झाला. अन्य दोन बॉम्ब फुटले नाहीत, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले. नंतर बॉम्बशोधक पथक आणि डॉग स्क्वॉडने दोन जिवंत बॉम्ब शोधून काढून ते निकामी केले. लोधी यांनी या बॉम्बफेकीचा आरोप जीतू यादव या आणखी एका वकिलावर केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या