महाबळेश्वर बस स्थानकात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राचे नंदनवन असलेल्या प्रसिद्ध महाबळेश्वरातील बस स्थानकातील एका चारचाकी वाहनात बॉम्ब असल्याची माहिती अज्ञात व्यक्तीने फोन करून दिल्याने एकच खळबळ उडाली. मंगळवारी सायंकाळपासून बुधवारी दुपारपर्यंत विविध पथकांकडून बॉम्बचा शोध घेण्यात आला. मात्र, कुठेही बॉम्ब अथवा बॉम्बसदृश वस्तू आढळून न आल्याने हा कॉल फेक असल्याचे दिसून आले. vनावी फोन करून बॉम्बची माहिती देणाऱया अज्ञाताविरोधात महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाबळेश्वर बस स्थानकात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आला होता. अज्ञाताने गाडी क्रमांकासह माहिती दिल्यामुळे महाबळेश्वर पोलिसांनी तातडीने बस स्थानक, आगार परिसरात तपासणी केली. मात्र, पोलिसांच्या हाती काही लागले नाही. रात्रीपासून बस स्थानकात बंदोबस्त वाढविण्यात आला होता. माहितीची खातरजमा करण्यासाठी आज पुन्हा सातारा येथून दहशतवादविरोधी पथक, बॉम्बशोधक-नाशक पथक व श्वान पथक बस स्थानक परिसरात दाखल झाले. या पथकांनी स्थानकातील प्रत्येक चारचाकी वाहनांसह प्रवाशांच्या सामानाची तपासणी केली. तसेच बस स्थानकातील बेवारस वाहनांचीही तपासणी करण्यात आली. बस स्थानकासमोरील टॅक्सीतळ व परिसरात तपासणी केली. पथकाने बाजारपेठेतदेखील फेरफटका मारून बॉम्ब ठेवलेले वाहन शोधण्याचा प्रयत्न केला. तीन तासांच्या तपासणीमध्ये बॉम्बसदृश कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. त्यामुळे आलेला फोन कॉल हा फेक असल्याचे समजले. दरम्यान, पोलिसांच्या शोधमोहिमेमुळे प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते.