
गुजरातमध्ये शाळांनंतर आता न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. गुजरात उच्च न्यायालयासह राज्यातील ६ जिल्हा न्यायालयांना मंगळवारी धमकीचे ईमेल प्राप्त झाले. या ईमेलमुळे प्रशासनाची मोठी धावपळ उडाली असून खबरदारीचा उपाय म्हणून न्यायालयाचा परिसर तातडीने रिकामा करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीकडून पाठवण्यात आलेल्या या ईमेलमध्ये न्यायालयात स्फोटके पेरल्याचा दावा करण्यात आला होता. यामध्ये गुजरात उच्च न्यायालय, राजकोट, सुरत, आणंद, भरुच आणि मेहसाणा या जिल्हा न्यायालयांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, दुपारी १:५५ पर्यंत स्फोट घडवून आणण्याची धमकी या ईमेलमध्ये देण्यात आली होती.
धमकी मिळताच स्थानिक पोलीस, बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) आणि श्वान पथकाने संबंधित न्यायालयांच्या इमारतींमध्ये धाव घेतली. न्यायालयीन कामकाज तत्काळ थांबवून सर्व वकील, कर्मचारी आणि पक्षकारांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. तासनतास सुरू असलेल्या सखोल तपासणीनंतर आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटके आढळून आलेली नाहीत.
दरम्यान, गुजरातमध्ये गेल्या दोन दिवसांपासून अशा धमक्यांचे सत्र सुरू आहे. सोमवारीच अहमदाबाद आणि वडोदरा येथील ३४ शाळांना अशाच प्रकारे बॉम्बच्या धमक्यांचे ईमेल आले होते, जे नंतर तपासात अफवा असल्याचे निष्पन्न झाले. आता न्यायालयांना लक्ष्य केल्यामुळे सायबर क्राईम विभागाने या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरू केला आहे. हे ईमेल नेमके कुठून आले आणि यामागे कोणाचे षडयंत्र आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.



























































