मुलुंडच्या रस्ते कामात कोटय़वधी रुपयांचा घोटाळा

मुलुंडच्या रस्ते कामात कोटय़वधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा करत याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. याचिकाकर्त्यांच्या याचिकेची तक्रार दाखल करून घेणार का, या तक्रारीची चौकशी करणार का, असे हायकोर्टाने पालिकेला विचारले.

मुलुंड येथील रस्त्याच्या कामाची निविदा पालिकेने काहोती, मात्र या कामात कोटय़वधींचा घोटाळा झाल्याची माहिती आरटीआयद्वारे उघडकीस आल्यानंतर आरटीआय कार्यकर्ता आयमान शेख यांनी मुंबई उच्च न्यायालयात ऍड. अक्षय भालेराव यांच्यामार्फत याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. याचिकाकर्त्यांच्या वतीने ऍड. भालेराव यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, रस्त्यासाठी लागणारे बांधकाम साहित्य तसेच वाहनांचे चलन यामध्ये तफावत असून बनावट कागदपत्रांच्या आधारे घोटाळा करण्यात आला आहे.