पैसे थकले तर शेती कशी करणार? 300 शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्याचा जामीन फेटाळला

शेतकऱ्यांचे पैसे थकले तर ते शेती कशी करतील, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने 300 शेतकऱ्यांचे पैसे न देणाऱ्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला. शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह शेतमालाच्या विक्रीवर निर्भर असतो. शेतमालाचे पैसे शेतकऱ्यांना वेळेवर मिळायला हवेत. त्यांचे पैसे थकल्यास पुढील हंगामात शेती करणे कठीण होऊन जाते, असेही न्या. राजेश पाटील यांनी नमूद केले.

नाशिक येथील प्रवीण जाधव विरोधात पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. शेतमालाचे पैसे न दिल्याचा जाधववर आरोप आहे. यात होणारी अटक टाळण्यासाठी जाधवने याचिका केली होती. या गुह्यांत 300 शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. जाधवची चौकशी होणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करत न्या. पाटील यांनी अटकपूर्व जामीन नाकारला.

दोन कोटी थकीत

300 शेतकऱ्यांच्या शेतमालाचे 2 कोटी 89 लाख रुपये थकले आहेत. जाधवसह अन्य एकाविरोधात याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शेतमाल विक्रीच्या पावत्या जाधवच्या नावाने आहेत. मात्र मला शेतमाल विकला गेला नसल्याचा दावा जाधवने केला आहे. शेतमाल वैभव ढेपळे या सहआरोपीला विकला गेला आहे. माझा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. मी नाशिक एपीएमसीमधून शेतमाल पोहोचवण्याचे काम करतो. त्यामुळे पावत्यांवर माझे नाव आहे, असे जाधवचे म्हणणे आहे. ते न्यायालयाने मान्य केले नाही.

शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत

शेतमाल घेऊन शेतकऱ्यांना पैसे दिले गेले नाहीत. याचा तपास होणे आवश्यक आहे. जाधवला अटकपूर्व जामीन देऊ नये, असा युक्तिवाद पोलिसांनी केला.