बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला ईमेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी, घटनास्थळी तातडीने बॉम्ब निकामी पथक दाखल

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली असून, बॉम्ब पथकाने संपूर्ण इमारतीची तपासणी केली आहे. परंतु काहीही संशयास्पद आढळले नाही. हा मेल एका अज्ञात व्यक्तीने कॉम्रेड पिनारायी विजयन यांच्या आयडीवरून पाठवला होता. यात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची इमारत उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती आणि असा दावा करण्यात आला होता की, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या टॉवर बिल्डिंगमध्ये आरडीएक्स, आयईडी बॉम्ब ठेवण्यात आले आहेत, जे दुपारी 3 वाजता स्फोट होईल.

पोलिस पथक आणि बॉम्ब निकामी पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी कसून तपासणी केली. परंतु, तपासादरम्यान त्यांना काहीही आढळले नाही. या प्रकरणात, बीएनएसच्या कलम 351(1)(ब), 353(2), 351(3), 351(4) अंतर्गत एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

पोलिसांचे म्हणणे आहे की, रविवारीच बीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर एका मेलद्वारे स्फोटाची ही धमकी देण्यात आली होती. परंतु रविवारी स्टॉक एक्सचेंज बंद असल्याने, तक्रारदाराने ईमेलनंतर सोमवारी संध्याकाळी पोलिसांशी संपर्क साधला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे आशियातील सर्वात जुने एक्सचेंज आहे.

यापूर्वीही वेगवेगळ्या शहरांमध्ये अशा अनेक बनावट धमक्या मिळाल्या आहेत. सोमवारी अमृतसरच्या सुवर्ण मंदिराबाबत अशीच धमकी मिळाली होती. मेलद्वारे दिलेल्या त्या धमकीत असा दावा करण्यात आला होता की सुवर्ण मंदिराचा लंगर हॉल आरडीएक्स वापरून उडवला जाईल. हरमंदिर साहिब व्यवस्थापन समितीने ही तक्रार पोलिसांना दिली होती, ज्यामध्ये असे सांगण्यात आले होते की एका अज्ञात व्यक्तीने मेलद्वारे आरडीएक्सद्वारे मंदिर उडवण्याची धमकी दिली होती.