बीड जिल्ह्यात पुन्हा बोंडअळीचे संकट, १ लाख हेक्टर कापूस उद्ध्वस्त 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
सामना प्रतिनिधी । बीड
राज्यातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या गुलाबी बोंडअळीने विदर्भानंतर आपला मोर्चा मराठवाड्यात वळवला आहे. बीड जिल्ह्यात बोंड अळीने चांगलेच थैमान घातले आहे. त्यामुळे येथील कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.

बीड जिल्ह्यातील शेतकरी सध्या द्विधा मनस्थितीत असून, बोंडअळीचा नायनाट कसा करायचा, की हिरवेगार दिसणारी कापसाची रोपं उपटून टाकायची अशा संकटात सापडला आहे. धारूर तालुक्यातील मोहखेड येथील एका शेतकऱ्याने तर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कापसाला लागलेली फुले तोडून टाकली आहेत. जिल्ह्यामध्ये जवळपास एक लाख हेक्टरवरील उभ्या कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे.

मागील हंगामात राज्यातील दहा लाख हेक्टरवरील कापसाच्या पिकाला बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे शेतकरी मराठवाड्यासह विदर्भातला कापूस उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाला होता. पिक उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी कर्जबाजारी होऊन अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या देखील केल्या होत्या.

यंदाची परिस्थिती देखील त्यापेक्षा फारशी वेगळी नाही. पुन्हा एकदा बोंडअळीचे संकट शेतकयांच्या उंबरठ्यावर उभे आहे. डौलाने उभ्या असलेल्या कापसाच्या पिकाला नेस्तनाबूत करण्याचे काम बोंडअळीने सुरू केले आहे.

बीड जिल्ह्यात एकूण ३ लाख २० हजार हेक्टरवर कापूस लागवड झाली असून कापसाच्या पिकाला आता फुले लागत आहेत. त्या फुलांना कुरतडण्याचे काम बोंडअळीने सुरू केले आहे. जिल्ह्यातील एक लाख हेक्टरवरील उभ्या कापसाच्या पिकाला बोंडअळीने ग्रासले आहे. त्यामुळे बोंडअळीचे संकट तातडीने दूर झाले नाही तर पुन्हा एकदा गतवर्षीची परिस्थिती निर्माण होणार आहे.

दरम्यान जिल्हा कृषी कार्यालय बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे सतर्क झाले आहे. तालुकापातळीवर तालुका कृषी अधिकारी गावागावात आणि शेता शेतात जावून बोंडअळीचे पिंजरे लावण्याचे काम करीत आहे. मात्र या पिंजऱ्यांच्या माध्यमातून बोंडअळीचा नायनाट कितपत होतो याबाबतही भीती व्यक्त केली जात आहे. बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कृषी कार्यालय हादरून गेले आहे आणि शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.