
मुंबईतील एन.टी.सी. गिरण्यांमधील कामगारांना अखेर दिवाळी पूर्वी बोनस आणि लॉकडाऊनच्या काळातील संपूर्ण पगार देण्याचे अखेर व्यवस्थापनाने मान्य केले आहे. यासंदर्भात राष्ट्रीय मिल मजदूर संघाने आक्रमक पवित्रा धारण केल्यानंतर प्रशासनाने अखेर यासंदर्भातील निर्णय जाहीर केला. यासंदर्भात संघाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री सचिन अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी या प्रश्नी काळोखी दिवाळी साजरा करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर प्रशासनाने यासंदर्भातील निर्णय घेतला.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाची विशेष बैठक नुकतीच अध्यक्ष सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यानंतर एनटीसी प्रशासनाची सूत्रे हलली. एनटीसी व्यवस्थापनाने संबंधितांशी बोलणी करून, बोनस-पगार दिवाळीपूर्वी देण्याचे मान्य केले आहे.
दरम्यान, बैठकीला खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनिल बोरकर, सेक्रेटरी लक्ष्मण तुपे यांनी या बैठकीला उपस्थित राहून, आपला पाठिंबा व्यक्त केला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर केला होता. पण अनलॉकमध्ये बरेचसे उद्योग सुरू झाले आहेत. परंतु केंद्र सरकारने या मुंबईतील एन.टी.सी.च्या गिरण्या अद्याप सुरू केलेल्या नाहीत.
त्यामुळे टाटा, पोदार, इं.यु.मिल क्र.5 तसेच अंशतः चालणाऱ्या न्यूसिटी गिरण्यातील कामगार आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या सुमारे 10 हजार जणांवर उपासमारीची टांगती तलवार अद्याप कायम आहे. तेव्हा केंद्र सरकारने या गिरण्या पूर्ववत चालवाव्यात अशी संघ नेत्यांनी मागणी केली आहे, नाहीतर कामगार रस्त्यावर उतरतील असा इशाराही देण्यात आला आहे.
































































