
वाचन संस्कृती लोप पावत असल्याची ओरड होत असताना नगरच्या रूपाली सोनवणे यांनी ‘पुस्तक भिशी’ हा उपक्रम सुरू केला आहे. पुस्तक वाचण्याच्या छंदातून सहज सुचलेली कल्पना म्हणजे पुस्तक भिशी. सध्या सुमारे 500 सदस्य या उपक्रमामध्ये जोडले गेले असून यातून चार हजार लोकांना पुस्तके मिळालेली आहेत. आवडीची पुस्तके तीही सवलतीत मिळत असल्याने सदस्यांचा चांगला प्रतिसाद या अनोख्या भिशीला मिळत आहे.
कसा चालतो उपक्रम?
पुस्तक भिशी उपक्रम कसा चालतो याविषयी माहिती देताना रुपाली सोनवणे म्हणाल्या, प्रत्येक आठवडय़ाला सदस्याला 100 रुपये भरावे लागतात. समजा, ग्रुपमध्ये 100 सदस्य असतील तर दर आठवडय़ाला 10 सदस्यांचे नंबर काढले जातील. त्या 10 सदस्यांना एक हजार रुपये किमतीची पुस्तके दिली जातील. अशा प्रकारे भिशी 10 आठवडे चालते आणि सगळ्या सदस्यांचा नंबर येतो. सदस्यांच्या आवडीच्या पुस्तकांची यादी मागवली जाते. त्या यादीतील पुस्तकांच्या किमतीप्रमाणे एक हजार रुपयांची पुस्तके सदस्यांच्या पत्त्यावर पाठवली जातात.
आणखी एक उपक्रम
ज्या भिशी सदस्याच्या गावाची लोकसंख्या पाच ते सहा हजार आहे अशा गावात गरजेची पुस्तके भेट म्हणून पाठवायचा आणखी एक उपक्रम रुपाली सोनवणे यांनी सुरू केला आहे. अलीकडेच मनमाड येथील वंजारवाडी या गावी स्पर्धा परीक्षेची पुस्तके पाठवण्यात आली आहेत. तेथील पुस्तक भिशी सदस्यांच्या सहकार्याने हे कार्य करण्यात आले आहे.
सदस्यांना मिळतात आवडीची पुस्तके
जशी पैशांची भिशी असते आणि आपला नंबर आल्यावर आपल्याला पैसे मिळतात. तसेच इथे पैशांऐवजी पुस्तके मिळतात. रुपाली सोनवणे यांना वाचनाची आवड आहे. प्रत्येक वेळी पुस्तक विकत घेऊन वाचणे परवडत नाही. त्यामुळे वाचनाची भूक भागविण्यासाठी पुस्तक भिशीची संकल्पना त्यांच्या डोक्यात आली. त्यांनी सहज फेसबुकला पोस्ट लिहिली आणि कुणाला पुस्तक भिशी लावायची आहे का? अशी विचारणा केली. तोपर्यंत रुपाली यांनी काहीच नियोजन केले नव्हते. मात्र काही सदस्यांचे पह्न येऊ लागले. सदस्यांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला. सुरुवातीला 40 लोक सहभागी झाले. 30 ऑगस्ट 2020 ला भिशीचा पहिला नंबर काढण्यात आला. सुरुवातीला रुपाली यांनी लहान मुलाच्या हाताने चिठ्ठी काढली. त्याचा व्हिडीओ सदस्यांना पाठवला. त्यामुळे सदस्यांचा उपक्रमाबद्दल विश्वास वाढला. सध्या या उपक्रमात सहभागी सदस्यांची संख्या 500 च्या वर गेली आहे.
सुरुवातीला वाटलं होतं की, फक्त गरजू लोकच पुस्तक भिशीचा लाभ घेतील. पण शिक्षक, डॉक्टर, विद्यार्थी असे सगळेच जोडले गेले आहेत. पुस्तकांचे पार्सल मिळाल्याचा आनंद सदस्यांना होतो. स्वतःच्या आवडीची पुस्तके खरेदी करता येतील असं कधी वाटलं नव्हतं, असं काही महिलांनी सांगितलं. आज त्यांच्याकडे 70-80 पुस्तकांचा संचय झालाय.
– रूपाली सोनवणे





























































