
सामना ऑनलाईन, मुंबई
वासुदेव गायतोंडे हे अस्सल कलावंत होते व असे कलावंत समाजाला नेहमीच समृद्ध करीत असतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी, गीतकार, दिग्दर्शक गुलजार यांनी केले. गायतोंडे यांची शैली, आयुष्य व त्यांचा अमूर्त कलेमागचा विचार चितारणाऱ्या ‘गायतोंडे’ या हिंदी पुस्तकाचे प्रकाशन गुलजार यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते.
‘गायतोंडे’ या मराठी गौरव ग्रंथाचा हा हिंदी अनुवाद डॉ. स्मिता दाते यांनी केला आहे. मला चित्रकलेचे फारसे ज्ञान नाही, मात्र मी चित्रकला जाणिवेच्या पातळीवर समजून घेऊ शकतो आणि त्या जाणिवेतूनच माझी कविता आकारते, असेही गुलजार यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आपल्या चित्रकलेवर आधारित काही कवितांचे वाचनही केले. हा ग्रंथ जगातल्या अनेक भाषांमध्ये अनुवादित होण्याची गरज असल्याचे इटालियन भाषेच्या प्राध्यापक डॉ. प्रतिष्ठा सिंह यांनी सांगितले. या कार्यक्रमाला देशभरातले चित्रकार, विद्यार्थी व कलारसिक उपस्थित होते.



























































