47 लाखांच्या पुस्तकांची बनावट खरेदी; आदिवासी वसतिगृह प्रकल्प अधिकाऱ्यासह पुस्तक विक्रेत्यास अटक

851

शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी पुस्तके खरेदी न करता सतत तीन वर्षे पुस्तक खरेदी केल्याची बिले सादर करून तब्बल 47 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सिडको पोलिसांनी तत्कालीन प्रकल्प अधिकारी गजानन फुंडे आणि स्वामी समर्थ बुक एजन्सी आणि स्वामी समर्थ बुक एजन्सीचे पुस्तक पुरवठादार शिवराम घेवारे या दोघांना अटक केली आहे. दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या सिडको एन- 8 आणि जिन्सी येथील वसतिगृहातील विद्याथ्र्यांसाठी 2014-15, 2015-16 आणि 2016-17 या शैक्षणिक वर्षासाठी पुस्तकांची खरेदी करण्यात आल्याचे दर्शवण्यात आले. तीन लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची पुस्तक खरेदी करताना निविदा काढणे बंधनकारक असताना या नियमांचे उल्लंघन करून तत्कालीन प्रकल्प अधिकाऱ्यांनी सर्रास विनानिविदा पुस्तके खरेदी केल्याचे दाखवण्यात आले आहे.

शासकीय वसतिगृहाचे गृहपाल व्ही. जी. गोरे, एन. वाय. मोरे, गणेश दुबे, एस. डी. गावीत आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी अ‍ॅडिशनल ट्रायबल कमिश्नर गिरीश सारोदे, प्रकल्प अधिकारी जी. एन. फुंडे, सहायक प्रकल्प अधिकारी रामप्रभू देशमुख, सहायक लेखाधिकारी राजू शिंदे, मुलींचे वसतिगृह, अंबाजोगाई गृहपाल सुनीता थोरे, विभागीय मुलींचे वसतिगृह समर्थनगर हाऊस मास्टर आम्रपाली रामटेके, मुलींचे वसतिगृह लातूर पी. पी. खानापूरकर या 11 जणांनी शालेय साहित्य व पुस्तक विक्रेते स्वामी समर्थ बुक एजन्सी संभाजीपेठ, सरस्वती बुक सेंटर सुपर मार्केट संभाजीपेठ, प्रगती बुक सेंटर दत्तमंदिर संभाजीपेठ, लक्ष्मी स्टेशनरी अ‍ॅण्ड सप्लायर्स नाथमंडी मार्केट संभाजीपेठ, तिरुपती एंटरप्रायजेस सिडको एन-8, माऊली जनरल स्टोअर्स बाभुळगाव रोड लातूर यांच्याकडून पुस्तके खरेदी केल्याचे दाखवले. परंतु या 11 जणांनी प्रत्यक्ष पुस्तक खरेदी न करता केवळ रकमेचा अपहार करण्यासाठी पुस्तके खरेदी केल्याची खोटी आणि बनावट बिले तयार करून कोणत्याही प्रकारची पारदर्शकता न बाळगता ती पुस्तक खरेदीची बिले म्हणून सादर करून ती मंजूर करून घेत 47 लाख रुपयांचा अपहार केला आहे.

प्रत्यक्षात ही पुस्तके खरेदीच केलेली नसल्याने शासकीय आदिवासी वसतिगृहातील मुला – मुलींना पुस्तकांपासून वंचित राहावे लागले व त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. विद्याथ्र्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर येथील खंडपीठात दाखल याचिकेत नेमण्यात आलेल्या कोर्ट कमिशनरने प्रत्यक्ष वसतिगृहाला भेट देऊन त्याची तपासणी केली. तपासणीमध्ये एकही पुस्तक खरेदी केल्याचे रेकॉर्ड त्या ठिकाणी आढळून आले नाही तेव्हा तसा अहवाल कोर्ट कमिशनर यांनी खंडपीठात सादर केला असता खंडपीठाने संबंधितांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

श्रीरामपूर येथील हुसेन दादाभाई शेख यांच्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना प्राथमिक तपासामध्ये आदिवासी वसतिगृहाचे प्रकल्प अधिकारी गजानन फुंडे आणि स्वामी समर्थ बुक एजन्सी आणि स्वामी समर्थ बुक एजन्सीचे पुस्तक पुरवठादार शिवराम घेवारे यांचा या कटात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यांनी फुंडे आणि घेवारे या दोघांना अटक केली.

अटकेतील दोघांना आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. वाडकर यांच्यासमोर हजर केले असता सरकारी वकील गौतम कदम यांनी त्या दोघांनी कट रचून हा अपहार केल्यामुळे त्याची कसून चौकशी करावयाची आहे, नोंदवही, टोकन रजिस्टरची पडताळणी करावयाची आहे, घेवारे यांच्या एजन्सीचे दोन बिलांचे पुस्तक आढळून आल्यामुळे त्याची चौकशी करावयाची असल्यामुळे पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी विनंती केली. न्यायालयाने विनंती मान्य करून शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

आपली प्रतिक्रिया द्या