
>> अस्मिता येंडे
‘समाजात अस्तित्वात नसलेल्या पितृसत्ताक पद्धतीमुळे ‘पुरुष’ हाच कुटुंबाचा प्रमुख बनला. या पितृसत्ताक पद्धतीमुळे स्त्राrला दुय्यम स्थान प्राप्त झाले. तिचं महत्त्व कमी होऊ लागलं. स्त्री ही सोशिक, नाजूक, परावलंबी त्यांमुळे तिच्यावर मतं लादली गेली. तिला स्वतःचं असं अस्तित्वच उरलं नाही. हे सर्व आपण पुस्तकातून वाचत आलो आहोत, ऐकत आलो आहोत आणि पाहतही आहोत.
संपूर्ण घराची जबाबदारी सांभाळणारी ती समाजाच्या नजरेत मात्र दुय्यम ठरली. तिच्यावर अन्याय-अत्याचार होऊ लागले. समाज स्त्रीला माणूस म्हणून घडू देत नाही तर स्त्रीत्वाच्या साच्यात तिला घडवलं जातं. आजही अशा स्त्रिया आहेत ज्यांचे ‘गृहिणीपण’ घरच्या व्यक्तींनाच कळले नाही तर समाजाला काय कळणार? स्त्रीच्या दुःखाच्या, वेदनेच्या, संघर्षाच्या, प्रगतीच्या अनेक गाथा वाचल्या असतील वा पाहिल्या असतील. अशाच सामान्य गृहिणीच्या असामान्य प्रवासाची कहाणी सांगणारं पुस्तक म्हणजे ज्येष्ठ कवयित्री-लेखिका शकुंतला चौधरी लिखित ‘आली वादळे तरीही’ ही चरित्रात्मक कादंबरी. शारदा प्रकाशनाने ही कादंबरी प्रकाशित केली आहे. या कादंबरीचे जे कथानक आहे संपूर्णतः सत्यमय आहे.
या कादंबरीचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग आहेत. या कादंबरीची नायिका ‘हिरा’ म्हणजेच हिराताई साने यांनी आपल्या आयुष्यातील अनेक अनुभव, प्रत्येक घटना अगदी तारखेसकट एका डायरीत बंदिस्त करून ठेवते. मनातल्या भावना, वेदना, जिवाची होणारी घालमेल त्या कुणाशीही बोलून दाखवत नव्हत्या. त्यामुळे या वेदनांना त्यांनी लेखनातून मोकळे केले. ती डायरी त्यांनी अगदी जपून ठेवली होती. पण आता तरी त्या डायरीतील अनुभव, वेदनांचा प्रवास इतरांना कळावा यासाठी ही डायरी लेखिका शकुंतला चौधरी यांच्या हाती सुपूर्द केली व ती डायरी ‘कादंबरी’ होऊन वाचकांच्या भेटीस आली.
‘आली वादळे तरीही’ या शीर्षकातून कळते की, कितीही वादळे आली तरी त्या वादळांना धीटपणे सामोरे जाणे हेच आपल्या हाती असते. आयुष्य म्हणजे एक प्रकारची परीक्षाच असते. कादंबरीतील नायिका ‘हिरा’ ही तात्यांची म्हणजे आपल्या वडिलांची फार लाडकी. लहान वयात इतका समजूतदारपणा हिरामध्ये होता की, आपल्या माणसांचा विचार करूनच ती दादांशी ‘हिराचे पती’ लग्न करते. लग्नानंतर शिक्षण पूर्ण करून नोकरी करता करता ती घराची, नवऱयाच्या भावंडांची जबाबदारी व्यवस्थित पार पाडते. नोकरी करत असूनही तिच्यावर परावलंबित्व येतं. हिराला कितीतरी वाईट अनुभवांना सामोरे जावे लागते. तिला तिचं असं अस्तित्वच उरत नाही. या कादंबरीत लेखिका शकुंतला चौधरी यांनी अशा बऱयाच प्रसंगांचं वर्णन केलं आहे ज्या प्रसंगातून वाचकांना हिराच्या संवेदनशील, विचारी मनाचं दर्शन घडते. इतक्या निराशामय प्रसंग आयुष्यात घडत असताना हिरा क्षणभरही डगमगत नाही.
लेखिका शकुंतला चौधरी यांनी इतक्या संवेदनशील शब्दांत हिराची कहाणी शब्दांकित केली आहे की वाचताना सुन्न होतं. या कादंबरीतील सगळ्यात वेदनादायक प्रसंग म्हणजे दादांच्या हेकट स्वभावामुळे हिराचं ‘मातृत्व’ही तिच्याकडून हिसकावून घेतलं जातं आणि ज्या ज्या पद्धतीनं ते हिसकावलं जातं त्याची आपण कल्पनाच करू शकत नाही. 1954 ते 1986 हा काळ हिराच्या आयुष्यातील खूपच वेदनादायी काळ होता. पतीच्या आजारपणात हिरा आपले कर्तव्य बजावते. ती आपल्या कर्तव्याला चुकत नाही. पावलोपावली आपल्या इच्छा-आकांक्षाना मारून आपल्या माणसांसाठी आपल्या सुखाचा त्याग करते.
दादांच्या निधनानंतरही हिरा स्वतःसाठी जगलीच नाही. ती आपल्या माणसांसाठी अविरत झटत राहिली.अशी ही हिरा… या हिराचा प्रवास पुस्तकरूपात आपल्यापर्यंत आणल्याबद्दल शारदा प्रकाशनाचे आभार. या कादंबरीला डॉ. प्रशांत धर्माधिकारी यांनी मार्मिक प्रस्तावना लिहिली आहे. कादंबरीचे लक्षवेधक मुखपृष्ठ चित्रकार सतीश खोत यांनी चितारले आहे. लेखिका शकुंतला चौधरी यांनी आपल्या शब्दसामर्थ्याने बंदिस्त डायरीला कादंबरीचे स्वरूप देऊन ‘हिरा’चा प्रवास, तिची घालमेल, तिची वेदना मांडली आहे. ‘आली वादळे तरीही’ ही कादंबरी वाचताना आपण कादंबरीचे कधी होऊन जातो, हेच कळत नाही. ही कादंबरी नक्कीच ‘वाचनीय’ आहे.
आली वादळे तरीही
लेखिका – शकुंतला चौधरी
प्रकाशक – शारदा प्रकाशन
मूल्य – 120 रु.



























































