
>> अॅड. मंदाकिनी पाटील
कुठल्याही इतर साहित्य प्रकाराप्रमाणे कथा कथनकाराच्या अनुभवसंपन्न जाणिवेचा आविष्कार असते. सुप्रसिद्ध कथाकार भिकू ना. बारस्कर यांच्या ‘गुंफण’ या कथासंग्रहातील ओळींना दृश्य रूपात मांडले तर असाच त्यात लेखक प्रतीत होत राहील. याहून पुढे जाऊन बोलायचे झाले तर हा कथासंग्रह म्हणजे जणू लेखकाचे छायाचित्रच!
‘गुंफण’मधील अगदी साध्यासोप्या शब्दांत मांडलेल्या अकरा कथांतून लेखकाची ‘प्रेम’ या विषयावरची श्रद्धा प्रकट होते आणि त्याबरोबरच मानवी मनाचे विविध पैलूही उलगडत जातात. फार जड तत्त्वज्ञान न सांगता जगण्याचे मोकळेढाकळे वर्णन करता करता लेखक एखादी सल व्यक्त करून या कालचक्राचा अविरत प्रवाह मान्य करून त्यासह आनंदी जीवन जगण्याच्या ऊर्मीतून प्रकट होत राहतो.
आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या कथा बनूना गुंफणमध्ये साकार झालेल्या आहेत. साध्यासोप्या शब्दांतून, घटना प्रसंगातून गुंफणमधील पात्रांच्या भावनिक आंदोलनांचे लेखकाने मनोज्ञ दर्शन घडवले आहे. लेखक आपल्या अंतस्थ जाणिवेच्या विविध स्पर्शांनी एखाद्या प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष काल्पनिक घटनेला, घटनाक्रमाला वेगवेगळे आयाम बहाल करतो. चोखंदळ वाचक त्याच्या अंतःचक्षूंद्वारे त्याला हवी तशी त्या त्या अंगाने तिला साकारत नेतो हे गृहितक भिकू बारस्कर यांचा ‘गुंफण’ हा कथासंग्रह वाचताना वाचकाच्या मनात पुन्हा पुन्हा अधोरेखित होत जाते.
समाजात अनेक भूमिकांतून वावरताना जे अनुभवले ते मांडले असे लेखकाने प्रस्तुत पुस्तकाच्या मनोगतात म्हटले आहे. आपल्या अवतीभवतीच्या कुटुंबातून, समाजातून नेहमीच दिसून येणाऱ्या वृत्तीप्रवृत्तीतून कथेतील पात्रांनी आकार घेतलेला आहे. नित्याच्याच घटनाक्रमात एखादी वेगळीच घटना त्यांच्या आयुष्यात घडते आणि ही घटना हाच कथेचा केंद्रबिंदू बनते. कथासंग्रहातील पहिलीच ‘गुंफण’ कथा याचे उदाहरण म्हणून सांगता येईल.
‘अस्ताची उधळण’सारखी एखादी फिक्शन कथा मानवी मनाचा पडदा उघडून घडवते दर्शन आतल्या आदिम प्रेरणेचे, मन वढाय वढायची जाणीव पुन्हा एकदा जाणवून देणारे. तर ‘गुंफण’सारखी कथा उलगडते मानवी मनाचे अनेक कप्पे, जे त्याने पराकाष्टेने बंद करून टाकलेले असतात. ‘प्रेमाला उपमा नाही’सारखे एखादे ललित यात आहे, ज्यात कथा फक्त बेस म्हणून वापरली असली तरी ते निव्वळ ललित आहे. ‘सुखी जीवनाचा मंत्र’सारखी एखादी विनोदाच्या अंगाने जाणारी प्राणी जगताशी सौहार्द जोडणारी कुटुंबवत्सल माणसाची वत्सल कथा यात आहे. ‘माणसाच्या मनात खूप गोष्टी खदखदत असतात. आयुष्यात खूप काही करायचे राहून जाते, पण उतरत्या वयात त्याचा विचार करीत न असता आनंदाने कसं जगता येईल याचा विचार केला तर जीवन नक्कीच सुखी होते.’
‘‘मित्रा, आता माझीसुद्धा वेळ संपत आलीय, चल येतो मी’ म्हणत काऊ पटकन उडून गेला. कोणत्याही मोहपाशात न अडकता, मला एकट्याला सोडून!’ यासारखी अवतरणे कथेला लक्षणीय करतात, तर ‘देवाधीदेवच तो! त्याला मरण नसलं तरी त्याचंही वय वाढलंच की आज. अनादी अनंतकाळापासून प्रकाशमान होताना तोही थकला असेलच की! तरीही तो त्याचं थकणं कुठे दाखवत नाही’ अशी चिंतनाची डूब कथेला वाचनीय करत जाते. वय हा विषय या कथांतून वारंवार डोकावतो. आपले वय झाले ही जाणीव तशी प्रत्येकालाच त्रासदायक ठरत असते, पण वढाय मन त्यावर कसा मात करण्याचा प्रयत्न करते ते वाचणे हा या कथावाचनाचा वाचकांसाठी एक आनंददायी परिणाम असेल. ‘अल्लड प्रेम’ हा कथेतून किशोरवयीन मुलाच्या मनाचा, त्याच्या भावभावनांचा, संवेदनांचा पट हळुवार उलगडला आहे, तर ‘अस्ताची आठवण’ या कथेत उतरत्या वयाच्या प्रौढ पुरुषी संवेदनांना हळुवारपणे उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच ‘गुंफण’ या संपूर्ण कथासंग्रहातच स्त्रीच्या कोमल भावनांचे पदर अत्यंत नाजूकपणे उलगडले आहेत.
‘जगन’, ‘अब्दुल्ला भिकारी’ यांसारख्या व्यक्तिचित्रे रेखाटणाऱ्या कथाही यात आहेत, ज्यातून समकालाचे चित्र वाचकाच्या डोळय़ांसमोर उभे करण्यात लेखक यशस्वी झाला आहे. ‘गुंफण’मधील कथा या हलक्याफुलक्या आणि सहज जाता जाता अनुभवाचे बोल बोलून जाणाऱ्या अशा आहेत, ज्या जीवनाची असोशी प्रकट करतात, ज्यात लेखकाची मूळची विनोद बुद्धी अधूनमधून आपला खेळकरपणा पेरून जाते. म्हटलं तर सर्वसामान्य माणसांच्या जगण्याच्या चक्रातील भावभावनांच्या, सूक्ष्म घडामोडींच्या, कलासक्त मनाने टिपलेल्या या नोंदी आहेत. सुरुवातीला वाचताना त्या घटनांचे वर्णन करीत आहेत असे वाटू लागते, तोच त्या हळूहळू गाभ्यात उतरू लागतात आणि वाचक सरसावून बसतो. अधिकाधिक खुला होत जातो. उतरू देतो कथेला आपल्या अंतःकरणात. मग हळूहळू निघून जातात पात्रे कथेच्या बाहेर आणि स्थिरावतो फक्त एक आशय… मनाच्या कथेतल्या चिंतनाचा!
‘संवेदना प्रकाशन’ने हा कथासंग्रह साकार केला असून सुप्रसिद्ध लेखक ‘कापूस’कार राजीव जोशी यांच्या चिकित्सक लेखणीतून या कथासंग्रहाचा ब्लर्ब उतरला आहे. नयन बारहाते यांचे बोलके मुखपृष्ठ या संग्रहाच्या देखणेपणात भर घालणारे असेच आहे. वाचकांनी हा संग्रह आवर्जून विकत घेऊन वाचावा असा आहे.
गुंफण
लेखक : भिकू बारस्कर
प्रकाशक : संवेदना प्रकाशन
मूल्य : रुपये 200/-





























































