उमेद वाढवणाऱ्या कथा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> एकनाथ आव्हाड

जीवन म्हणजे आशा-निराशा, प्रसन्नता-अस्वस्थता,जवळीक-दुरावा… असे विरोधाभासी अनुभव. परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये जागृत राहाणं हाच परिवर्तनाचा मूलमंत्र होय हेच कथेच्या अंगाने, जीवनाला भिडणाऱ्या अनेक प्रसंगांतून लेखकद्वयी डॉ. महेश अभ्यंकर आणि आरती भार्ज यांनी लिहिलेले इमोझील- मनोबल उंचावणाऱ्या कथा हे पुस्तक वाचकांच्या मनाचा ठाव घेणारे आहे.

मनोगतात ते म्हणतात, ‘काम करताना सतत सतर्क राहणे आवश्यक असते, त्यामुळे मेंदूवर ताण येत असतो. मेंदूला सतत कार्यरत राहावे लागते. त्यामुळे खरोखरीची विश्रांती अशी कधी आपण अनुभवतच नाही. कदाचित याच कारणास्तव, त्या वैश्विक शक्तीने बहुधा हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला आणि सारे जग काही काळासाठी थोपवून ठेवले.’ साथीच्या या काळातील भावनिक संक्रमणे आणि स्थित्यंतरे शब्दबद्ध करण्यातून हे पुस्तक खऱ्या अर्थाने आकाराला आले आहे.

या पुस्तकात, तुम्ही अशा सामान्य लोकांना भेटाल की ज्यांच्या कथा मात्र असामान्य आहेत. ही माणसे तुमच्या आमच्या सारखीच हाडामांसाची आहेत. अनेकदा निराश होतात, भावनावश होतात, प्रतिक्रिया देतात, पण अखेर त्यांना परिवर्तनाचा एक क्षण सापडतो, जो पकडून ते स्वतःच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणतात. या कथांमध्ये आशा आणि निराशा, प्रेम आणि तिरस्कार, प्रसन्नता आणि खिन्नता याबद्दल तुम्ही वाचाल. नियतीच्या क्रूर खेळामुळे अडकलेल्या जिग्नेश आणि अॅना यांच्याबद्दल सहानुभूती वाटेल तर डॉ. वैद्य आणि डॉ. स्नेहा यांच्याकडून प्रेरणा मिळेल. या पुस्तकात तुम्हाला मीना भेटेल जिची सांसारिक कुचंबणा तिला टोकाची भूमिका घेण्यास भाग पाडते आणि तिचा नवरा मंदार प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढतो. या सर्व कथांमध्ये एक समान पात्र आहे अनिरुद्ध, जो काही ठिकाणी परिवर्तनाचा उत्प्रेरक आहे, काही ठिकाणी मित्र तर काही ठिकाणी फक्त घटनांचा साक्षी.

सामान्य दिसणाऱ्या लोकांनी ह्या असामान्य परिस्थितीला कसे तोंड दिले, अडखळत, धडपडत त्यांनी कशी नवी दिशा शोधली हे दर्शविणाऱ्या कहाण्या म्हणजे ‘इमोझील : मनोबल उंचावणाऱ्या कथा’ हे पुस्तक होय.
वैद्यकीय सल्लागार डॉ. महेश अभ्यंकर आणि मानसिक विकास सल्लागार आरती भार्ज त्यांनी या काळात केलेल्या समुपदेशनावर आधारित 12 कहाण्या या पुस्तकात आहेत. या कहाण्या कुठल्याही कठीण काळात मार्गदर्शक ठरतील अशाच आहेत. या पुस्तकातील पात्रांकडून आपल्याला नवी उमेद, आयुष्याची नवीन दिशा मिळत राहील, असा विश्वास वाटतो.

इमोझील : मनोबल उंचावणाऱ्या कथा
लेखक : डॉ. महेश अभ्यंकर, आरती भार्ज
प्रकाशक : रोहन प्रकाशन
पृष्ठ : 194, मूल्य : रुपये 250/-