समाज जीवनाचे व्यापक चित्रण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अस्मिता प्रदीप येंडे

कादंबरी हा साहित्य प्रकार विस्तृत आहे. समाजात वावरताना असे अनेक प्रसंग, घटना आजूबाजूला दिसत असतात. लेखक हे सगळं आकलन करतो. समजून घेतो. कथानकाचा विस्तार करतो. घटना, प्रसंग, भावना, वेदना, पात्रे, काळ, घटनाक्रम, वातावरण निर्मिती, स्थळ, पात्रांची देहबोली, बोली, संवाद हे सगळं एका धाग्यात बांधतो. त्यासाठी कल्पनाशक्ती, स्फूर्ती, आकलनशक्ती आवश्यक असते.

लेखक राजेंद्र पारे यांच्या ‘ठिगळ अन् टाके’ या काव्यसंग्रहातून सामाजिक जाणिवा, वेदना अधोरेखित झाल्या. त्यानंतर त्यांच्या सर्जनशील लेखणीतून ‘बुद्धा इज स्माईलिंग’ ही कादंबरी अवतरली आहे. नभ प्रकाशनाने ही कादंबरी प्रकाशित केली आहे.

‘बुद्धा इज स्माईलिंग’ पुस्तकाचं शीर्षक सकारात्मक जाणीव करून देणारे आहे. कादंबरीचे कथानक काल्पनिक असले तरी कुठेना कुठेतरी त्यातील घटना, एखादा प्रसंग आयुष्यात घडत असतात किंवा भूतकाळात घडलेले असतात. शेवटी साहित्य हा समाजमनाचा आरसा आहे आणि लेखक हा समाजाचाच एक घटक आहे. त्यामुळे समाजाचे प्रतिबिंब साहित्यात उमटते.

या कादंबरीत दीपंकर नावाचा नायक आहे, जो स्वतः आपल्या पत्नीला शीतलला आपल्या आयुष्याचा प्रवास कथन करत आहे. नायक स्वतः निवेदकाच्या भूमिकेत आहे. कादंबरी वर्तमानकाळ – भूतकाळ असा प्रवास करत पुढे जाते. त्यात अनेक पात्रे वाचताना भेटतात. वेगवेगळ्या स्वभाव, विचार-आचारांच्या या व्यक्ती हळूहळू कथानक पुढे नेतात. लेखकाने या काल्पनिक कथानकातून सामाजिक स्थित्यंतरे सांगितली आहेत. समाजातील अनेक समस्यांवर भाष्य केले आहे. जातीपातीच्या भेदामुळे किती अन्याय लोकांवर झाले, समाज विभागला गेला, जातीभेदामुळे कित्येक नाती भस्मसात झाली, त्यासोबत गावातील वातावरण ते शहरातील गजबजाट यातील फरक लेखकाने अगदी योग्य पद्धतीने मांडला आहे.

कादंबरीतील रामूदादाच्या पात्राद्वारे लेखकाने सत्तेच्या हव्यासापोटी गावातील तरुण पिढी कशी वाया घालवली याचे वास्तव मांडले आहे. धूम्रपान, मद्यपान, जुगार यामुळे तरुणाईचे कसे नुकसान होत आहे, हे दिसून येतेच. कादंबरीत शुभा आणि शशी यांच्या निरागस, नितळ प्रेमाचे प्रसंग वाचकांच्या मनावर हळुवार प्रेमसरींचा वर्षाव करतात. शुभा-शशीचे पत्र वाचताना आपोआप ती वाचकांना भूतकाळात घेऊन जाते.

कादंबरीत स्त्री जीवनाचे वास्तव लेखकाने मांडले आहे. स्त्रीच्या जाणिवा, तिच्या भावना, वेदना, तिची निष्ठा, तिच्यावर होणारे अन्याय, अत्याचार, तिच्या आयुष्याचे खरे रूप यात दिसून येते. काळ कितीही बदलला तरीही स्त्रियांचे विश्व तसेच आहे याची जाणीव ही कादंबरी करून देते. दीपंकर आणि शीतल यांचं लग्न, दीपंकरची आई शुभांगी यांची कथा, त्यात तिच्या वडिलांनी केलेली आत्महत्या, त्यांच्या पुटुंबाला सावरणारी माई, गावातील वाढती व्यसनाधीनता या सगळ्या घटना एकामागून एक घडत जातात आणि वाचक त्यात गुंतत जातो. संघर्ष, दुःख, काळजी, मनाची तळमळ, त्याग या सगळ्यात होरपळणारी पात्रे, त्यांचा प्रवास मन सुन्न करून टाकतात. या अनपेक्षित घडणाऱ्या घटनांमुळे पात्रांची बदलत जाणारी मनःस्थिती अस्वस्थ करते. पुढे काय घडेल? ही उत्सुकता सतत जाणवत राहते आणि मन कादंबरीत गुंतत जाते.

लेखक राजेंद्र पारे यांनी ‘बुद्धा इज स्माईलिंग’ कादंबरीद्वारे समाजजीवनाचे, व्यक्तींचे वेगवेगळे रूप दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. सोबतच समाजातील चुकीच्या समजुती, विचार करण्याची संकुचित वृत्ती, सामाजिक, वैचारिक, सांस्कृतिक दृष्टीने समस्या आपल्या या स्वतंत्र, सर्जनशील लेखणीतून आविष्कृत केल्या आहेत. किरण डोंगरदिवे यांनी या पुस्तकाला मार्मिक प्रस्तावना लिहिली आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ बुद्धभूषण साळवे यांनी सजवले आहे. प्रा. डॉ. केशव देशमुख यांनी कादंबरीची छान पाठराखण केली आहे.

बुद्धा इज स्माईलिंग

लेखक : राजेंद्र पारे

प्रकाशक : नभ प्रकाशन

मूल्य : रुपये 250/-