
>> दिलीप देशपांडे
आपल्याला आयुष्यात अनेक माणसं भेटत असतात, त्यात आपल्या व्यवसायात भेटणारी माणसं असतात, तर काही कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटणारी माणसं असतात. त्यात सामाजिक कार्य, राजकीय क्षेत्र, सांस्कृतिक कला साहित्य अशी काही विशेष गुण असणारी माणसं भेटत असतात. त्यांचा आपल्याला सहवास लाभत असतो. पण या भेटीचा, सहवासाचा वृत्तांत आपल्या लिखाणात लिहून ठेवणारी, टिपून ठेवणारी फार कमी माणसं असतात. असेच ‘प्रकाशाचे दिवे’ या पुस्तकाचे लेखक मिलिंद चिंधडे हे आहेत. त्यांनी अचूक टिपणे, नोंदी ठेवल्यात.
गेल्या वर्षी अशाच मान्यवरांच्या स्वाक्षरीचा संग्रह असलेले पुस्तक ‘स्वाक्षरीच्या जगात’ प्रकाशित झाले आहे. चिंधडे हे व्यवसायाने वकील आहेत तसेच वकिलीचा अभ्यास शिकवणारे प्राध्यापकही आहेत. त्यांचे कार्यक्षेत्र मोठे आहे.
त्यांना वेळोवेळी जी काही खास गुणविशेष असणारी माणसं भेटली, काहीतरी कारणांमुळे त्यांच्याशी संबंध आला, त्यांच्या कार्यासह स्वभावाचे विशेष त्यांनी आपल्या लिखाणात टिपले आहे, मग ती माणसं त्यांच्या व्यवसायासंबंधित तर कोणी साहित्य, कला, समाजकार्य, देशकार्य या सर्वांशी संबंधित आहेत. मुख्य म्हणजे त्यांनी आपल्या आतापर्यंतच्या आयुष्यात अनेक माणसे जोडली. तो त्यांचा स्वभाव आहे आणि निमित्ताने तसे त्यांच्याविषयी लिखाण केले आहे. या पुस्तकात त्यांनी जवळपास 50 व्यक्तींचा परिचय थोडक्यात वाचकाला करून दिलेला आहे. त्यांचा लोकसंग्रह मोठा होता व आहे, हे लक्षात येते.
यातील लेख त्या व्यक्तीच्या जन्मतिथी, पुण्यतिथी, निधन, एकसष्टी, पासष्टी, सहस्रचंद्रदर्शन यानिमित्ताने लिहिले आहेत. त्या लेखांमधून त्या त्या व्यक्तीचा थोडक्यात परिचय, स्वभावदर्शन होते.
पोलीस अधिकारी अरविंद इनामदार स्पष्टवत्तेपणा आणि इमानदारी, खरेपणा गुणांसाठी प्रसिद्ध होते. यामुळे त्यांच्या बऱ्याच ठिकाणी बदल्या झाल्यात. तरी पण निवृत्तीनंतरही पोलीस खात्यात कसे चांगले बदल करता येतील याविषयी ते प्रयत्नशील होते.
कवी वसंत बापट यांच्यावरचा लेख यात आहे. राष्ट्रसेवा दलाच्या कार्यात त्यांचा मोठा सहभाग होता. कलापथक व महाराष्ट्र दर्शनाचे प्रयोग अनेक ठिकाणी त्यांनी घडवून आणले. गगन सदन तेजोमय, तिमिर हरून करुणा कर, दे प्रकाश अभय ही त्यांची कविता/गीत ‘उंबरठा’ या सिनेमात घेतले आहे. वसंत बापट, विंदा करंदीकर व मंगेश पाडगावकर यांच्यासोबत काव्यवाचन करण्याची संधी मला कॉलेज जीवनात मिळाली होती ही गोष्ट त्यानिमित्ताने सांगावीशी वाटली.
नाशिकचे भावगीतकार योगेश्वर अभ्यंकर यांच्यावर लेख यात आहे. आकाशवाणी केंद्रावरून आपण त्यांची भक्तिगीते नेहमी ऐकली आहेत. अनेक संस्थांमध्ये त्यांचा सहभाग होता. श्रीधर वर्तक पेशाने वकील परंतु प्रखर हिंदुत्ववादी, साहित्यिक आणि क्रांतिकारी.
नानाराव ढोबळे महाराष्ट्र प्रांताचे आणि संघाचे प्रमुख होते. साधेपणा, प्रभावी वत्तृत्व आणि भावुकता त्यांचे गुण होते. त्यांचा परिचय आपल्याला होतो. ‘संघयोगी नाना ढोबळे’ हे पुस्तक श्याम अत्रे यांनी त्यांच्यावर लिहिले आहे. अॅड. मनोहर गोरवाडकर, भास्कर आव्हाड, बाबूराव ठाकरे यांचाही परिचय होतो. वाचनप्रेमी देवकिसनजी सारडा, वैद्यकीय व्यवसाय असूनही लेखन आणि वाचन जोपासणाऱ्या मिरजेच्या डॉक्टर वसुंधरा कट्टी, प्राचार्य मो. स. गोसावी यांच्याविषयी वाचायला मिळते.
रमाकांत तांबोळी – मिलिंद चिंधडे यांचे सासरे, सेवाभावी व कार्यमग्न असे व्यक्तिमत्त्व पुण्याच्या सह्याद्री हॉस्पिटल व समवेदना या संस्थेतही सहभाग होता. शास्त्रीय संगीत तसेच प्रवासाची आवड होती. त्यांच्या सासूबाई वैजयंती तांबोळी यांनाही सामाजिक कार्याची आवड. पंढरपूरला आश्रमात असताना त्यांनी 32 मुलींची लग्ने लावली, कन्यादान केले. प्रत्येकीचे केळवण केले आणि नंतरही ओटी भरल्याशिवाय कधी त्या मुलींना पाठवले नाही. सेवाव्रती समाजसेविका असा त्यांचा उल्लेख केला आहे.
विनायक पाटील, कादंबरीकार – बाबा कदम, प्रभाकर शिवराम जोगळेकर, ए.पी. देशपांडे, बाळासाहेब गायधनी, गोविंदराव काळे, भास्कर आव्हाड, प्राध्यापक दिलीप फडके, शेखर जोशी, रमेश देशमुख यांच्यासह नारळासारखा गोडवा असणारे वडील – मधुकरराव चिंधडे व सेवाभावी-त्यागी वृत्तीची आई मालती चिंधडे यांच्याविषयी पुस्तकात लिहिले आहे. अजून बऱ्याच जणांचा कार्यपरिचय यात मिळतो.
पुस्तकाला प्राध्यापक डॉक्टर यशवंतराव पाटील यांची प्रस्तावना आहे. प्रस्तावनेत ते म्हणतात, ही सगळी व्यक्तिचित्रे व त्या त्या व्यक्तीचे गुणांचे, स्वभावाचे, वृत्ती-प्रवृत्तीचे काही प्रमाणात का होईना आकलन करून देण्याचे सामर्थ्य लेखकाच्या लेखनात निश्चित आहे. कल्पनेचे पंख लावून व्यक्तिचित्रण करायचे नसते हे पथ्य लेखकाने पाळले आहे. म्हणून ते अभिनंदनास पात्र आहेत आणि अजूनही अधिक दर्जेदार लेखन व्हावे ही अपेक्षा व्यक्त केली आहे, तर प्राचार्य भास्कर गिरधारी यांनी – असे व्यक्तीचे कार्य शब्दबद्ध करणे व प्रकाशात आणणे हे फार मोठे काम चिंधडे यांनी मनापासून केले आहे! लेखक म्हणतात, माझ्या आयुष्याच्या वाटचालीत अनेक जणांनी माझ्या जीवनावर प्रभाव टाकला. त्यातील 50 व्यक्तींची व्यक्तिचित्रे यात आहेत.
पुस्तक वैशाली प्रकाशन – पुणे यांनी प्रकाशित केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ, छपाई चांगली आहे. प्रकाशाचे दिवे कोण आहेत जाणून घेण्यासाठी हे पुस्तकच वाचायला हवे. म्हणजे सर्वच प्रकाशाच्या दिव्यांचा परिचय होईल.
प्रकाशाचे दिवे
लेखक : मिलिंद मधुकर चिंधडे
प्रकाशक : वैशाली प्रकाशन, पुणे
मूल्य : रुपये 160/-





























































