परीक्षण – समृद्ध करणारं जगणं

>>संध्या सिनकर

या पुस्तकात निरुपमा सोनाळकर यांनी वयाच्या पंचविशीपासून पस्तीस-छत्तीस वर्षांच्या जर्मनीतील वास्तव्याचे, जर्मन मित्रमैत्रिणींचे उत्कट अनुभव लिहिले आहेत. पुस्तक वाचताना जर्मन समाज व संस्कृतीची ओळख होते. त्याचबरोबर निरुपमा यांचे वैयक्तिक अनुभवही कळतात. त्यांच्या प्रवासाच्या आवडीमुळे हिंदुस्थानातील व युरोपमधील बऱयाच प्रदेशांची सफरही वाचकांना घडते.

निरुपमा या 1968 साली अतुल सोनाळकर यांच्याशी लग्न करून जर्मनीतील ल्युनेबुर्ग या निसर्गसंपन्न गावी आल्या. आजूबाजूला इंग्रजी जाणणारे कोणी नाही. जर्मन भाषा येत नाही. त्यामुळे त्यांना एकटेपणा वाटू लागला. पण नंतर कोर्नेलिया नावाची 13-14 वर्षांची मुलगी त्यांच्याकडे आली. ती निरुपमा यांना जर्मन शिकवी व त्या तिला इंग्लिश शिकवत.

निरुपमा यांचा खुला, खेळकर, उमदा, उत्साही-उत्सवी स्वभाव आणि कुतूहलसंपन्न दृष्टिकोन यामुळे वाचक त्यांच्या अनुभवाशी समरस होतो. त्यांच्या व्यक्तिगत जीवनातील चढ-उतार, मित्र-मैत्रिणींचा स्नेह, काहींची ताटातूट व निकटवर्तीयांचे मृत्यू अशा अनेक चांगल्या-वाईट प्रसंगाशी वाचक जोडले जातात. जर्मन भाषा थोडी अवगत झाल्यावर त्या तेथील समाजात मिसळायला लागल्या. ल्युनेबुर्गमध्ये निरुपमा यांच्याकडे नेहमी पाहुणे येत. आई किंवा सासूबाई आल्या की अडीच-तीन महिने रहात. व्यवहारी जर्मन लोकांना याचे आश्चर्य वाटे. जास्त दिवस राहणाऱया पाहुण्याने घरखर्चात मदत करायची हे तिकडे गृहीत धरलं जातं.

हिंदुस्थानी लोकांप्रमाणे जर्मन लोकांना सगळे सण-परंपरा उत्साहाने साजरे करायला आवडतात. जर्मनीत इस्टर, लेंट व नाताळ हे मुख्य सण सर्व पंथाचे ख्रिश्चन जर्मन साजरे करतात. सप्टेंबर महिन्यात म्युनिकमध्ये होणारी ऑक्टोबर फेस्ट आता जगप्रसिद्ध झाली आहे. यात बिअर या पेयाला व बिव्हेरियातील प्रांतिक संगीत व नृत्य याला खूप महत्त्व आहे. वर्षातील पाच-सहा महिने थंडी व तीन साडेतीन वाजल्यापासून अंधार होणारे लहान दिवस यात उत्साह व उमेद टिकवून ठेवण्यासाठी समाजात असे अनेक सण व परंपरा रुळल्या आहेत.

जर्मनीत निरुपमाजींचे अनेक घनिष्ठ मित्र-मैत्रिणी झाले. अनेकांशी त्यांचे जवळचे कौटुंबिक संबंध जुळले. त्यांच्या घरी नाताळसारखे उत्सव साजरे होत. पाडवा, दसरा व दिवाळी अतिशय उत्साहाने दारात रांगोळ्या काढून, हिंदुस्थानातून उटणे आणून व घरी फराळ करून साजरे होत. फराळाला एक दिवस जर्मन मित्र-मैत्रिणीही येत. निरुपमा यांचे कुटुंब जर्मन समाजात छान मिसळले होते. मुलं लहान असताना ते चौघे एखाद्या शनिवार-रविवारी मशरूम शोधण्याच्या निमित्ताने वुड्समध्ये जात. हवा थंड असली तरी ऑक्टोबरमध्ये झाडाच्या पानांना वेगवेगळे रंग असल्याने परिसर अप्रतिम दिसे. त्यांना दोनच मशरूम ओळखता येत. तेच मशरूम चाकूने देठाशी कापत व जमा करत. आडेनडोर्फमध्ये त्यांच्या घराच्या जवळ फार्म हाऊस असलेल्या मिसेस किर्शहोफ यांच्याकडून अनेक चविष्ट प्रकार शिकल्या. जर्मन लोक, त्यांचे राहणे, शिष्टाचार, खाण्याच्या सवयी व तिकडचा निसर्ग सगळ्याची माहिती निरुपमाजींच्या वेगवेगळ्या अनुभवांतून आपल्याला कळते

निरुपमा यांचा स्वभाव मोकळा व संवेदनाक्षम आहे. परिश्रम करण्याची त्यांची तयारी आहे व त्यांना नवीन गोष्टी शिकण्याची आवड आहे. समोर आलेली संधी त्या लगेच स्वीकारतात. त्यांनी जर्मनीत बॅडमिंटन शिकवले. अनेक वर्षं हिंदुस्थानी कुकिंगचे क्लासेस घेतले. त्यांच्या मयूर ट्रव्हल्स कंपनीतर्फे जर्मन मित्रमैत्रिणींबरोबर हिंदुस्थानच्या टूर्स केल्या. पुस्तकात हिंदुस्थानातील, युरोपातील व जर्मनीतील स्थळांचे सुंदर वर्णन आहे. आपल्या कंफर्ट झोनच्या बाहेर येऊन प्रयत्न केले तर अधिक संपन्न करणारे अनुभव मिळतात हे निरुपमाजींच्या अनुभवावरून वाचकांना समजते.

ऍम्स्टरडॅमजवळील फोलेनडाम नावाचं एक छोटंसं फिशर व्हिलेज हे निरुपामाजींचं आवडतं ठिकाण. छोटी टुमदार घरे, फळा-फुलांच्या बागांनी नटलेले हे सुंदर गाव आहे. हॉलंडमध्ये एका गावाबाहेर, कॅनॉलच्या काठावर, त्यांना एक सुंदर पवनचक्की दिसली. पवनचक्कीच्या आत एक सुंदर घर बांधलं होतं. पवनचक्कीचा मोठा अष्टकोनी घेर होता. प्रत्येक कोनाला एक मोठी काचेची खिडकी होती. सौम्य सजावट असलेलं हे एक स्वप्नवत घर होतं.

साल्झबुर्ग गावाजवळ आडलर्स होस्ट (गरुडाचे घरटे) हे हिटलरच प्रसिद्ध ठिकाण आहे. हे ठिकाण उंच डोंगरावर सहजपणे कोणाला सापडणार नाही असं बांधलं आहे. हिटलरने त्याच्या अधिकाऱयांशी गुप्त भेटीकरिता व त्याची प्रेयसी इव्हा ब्राऊनला भेटण्याकरिता सगळ्या बाजूंनी डोंगरांनी वेढलेल्या एका कपारीत हे ठिकाण बांधलं होतं. डोंगराच्या टोकावर जाण्यासाठी भव्य लिफ्ट आहे. डोंगरावरून भवतालचा प्रदेश खूप निसर्गरम्य दिसतो, पण हे ठिकाण मात्र कुठूनही दिसत नाही.

त्यांच्या जर्मनीतील वास्तव्यात निरुपमा यांनी पूर्व व पश्चिम जर्मनी सांधणारी भिंत हटली तेव्हाचं वातावरण बघितलं. पहिल्यांदा जल्लोष… नंतर पूर्व जर्मनीच्या लोकांची पश्चिम जर्मनीमध्ये खरेदीसाठी लागलेली लाईनही बघितली. जर्मनीचे चलन बदलून युरो झाले तेंव्हाच्या लोकांच्या प्रतिक्रियाही त्यांनी ऐकल्या.

त्यांची भाषा सहजसोपी व ओघवती आहे. समोर आलेल्या संधीचा फायदा घेतला, नवीन गोष्टी शिकल्या व जीवनाकडे सकारात्मकपणे छोटय़ा छोटय़ा गोष्टींचा आनंद घेत पाहिलं तर आपली प्रगती होतेच; पण माणूस म्हणूनही आपण अधिक समृद्ध होतो हे निरुपमा यांचा जीवन प्रवास बघताना प्रकर्षाने जाणवते.

आपली प्रतिक्रिया द्या