आहे मनोहर तरी- साहचर्य कथा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. विजया वाड

‘आहे मनोहर तरी’ सुनीता बाईंच्या शब्दांतून पुलं आणि त्यांची साहचर्य कथा… मनास हुरहुर लावून बरेच काही शिकवणारी…

पुलं म्हणजे महाराष्ट्राचा लाडकं व्यक्तिमत्त्व. त्यांच्या पत्नी सुनीता देशपांडे. ‘आहे मनोहर तरी…’ मधला हा ‘तरी’चा आहे एक आठवणींचा झोका. लेखिका स्वतःच म्हणते, सफळ संपूर्ण व्हायला ही साठा उत्तरांची कहाणी नाहीच. ही साठा प्रश्नांची कहाणी. सफळही नव्हे आणि निष्फळही नव्हे. अपूर्ण मात्र नक्कीच.

‘आहे मनोहर तरी गमते उदास’ अशी मनाची अवस्था झालीय. मी छोटय़ा नातवंडांना… या पाखरांना… गोष्ट तरी कोणती सांगू?’ असेही सुनीताबाई लिहून जातात. अन् तरीही पूर्णात् अपूर्णवत् वाटणाऱया या कहाणीचे प्रत्येक पानन् पान वाचनीय झाले आहे. आठवणींच्या प्रदेशातली लेखिकेची ही स्वैर भटकंती तिच्या जीवनाशी अदृश्य संबंध ठेवत आपल्याशी मुक्त संवाद साधते. लेखिकेची शब्दांची रांगोळी मनाला मोहवते.

आयुष्यात लाभलेल्या मित्राशी लग्नगाठ बांधण्याचे भाग्य फार थोडय़ा माणसांना लाभते. पुलंना सुनीताबाई ‘भाई’ म्हणत. हा मित्र आयुष्याचा जोडीदार म्हणून लाभला. पुढे तो लोकोत्तर पुरुष झाला, पण सुनीताबाईंमुळे त्याच्या आयुष्याला शिस्त लागली, असेही वाटून जाते, असे काही प्रसंग पुस्तकात मोकळेपणी वर्णिले आहेत.

आपल्या लहानपणीच्या आठवणीत बालदत्तात्रेयाच्या छायाचित्राची त्या कशी पूजा करीत ते वर्णिले आहे. पुढे कधी तरी त्या नास्तिक झाल्या. लेखिका म्हणते, ‘नास्तिक्य ही अभिमान वाटण्यासारखी गोष्ट असली तरी त्यात मनःशांती नसते. आस्तिक्य हे बिनबुडाचे खरे, पण त्या अज्ञानात सुख नक्कीच असते. इथे सुखाचा अर्थ स्थैर्य, आधार, शांती असाही असेल. यामुळे मला माझ्या नास्तिक्याचा अभिमान असला तरी आस्तिकाचा हेवा वाटतो.’ केवढे प्रामाणिक निवेदन ना?

पती आणि पत्नी यांच्या नात्यात नव्याण्णव टक्के ‘अतिपरिचयात अवज्ञा, संतत गमनात अनादरो भवती… मलये भिल्ल पुरंध्री चंदन तरू काष्ठय़मिधनं कुरूते’ हा श्लोक अर्थाअर्थी खरा ठरतो. तीच गोष्ट इतरांनी केली तर त्याबाबत अगत्य नि बायकोने केली तर ‘त्यात काय?’ अशी ऑटिटय़ूड! पुलंही त्यास अपवाद नव्हते. सुनीताबाई ड्राइव्ह करीत तेव्हा ते पॅसेंजरची भूमिका घेऊन ‘सूचना’ देत. इतरांनी ड्राइव्ह केले तर विश्राम कर, दमला असशील, ‘खाऊन घे’ अशी प्रेमळ आग्रही अगत्यमय दटावणी असे. सुनीताबाईंनी तरीही त्यांचे सारथ्य आयुष्यभर विनातक्रार केले. अगदी चारचौघी बायका वांग्याची भाजी नि पुरणपोळी सारख्याच चवीने खाणाऱ्या, स्तुती न करणाऱ्या नवऱ्याचा सांभाळ वर्षानुवर्षे विनातक्रार करतात, त्याप्रमाणेच!

भाईंच्या कलागुणांतून बराच पैसा उभा राहिला हे खरे. पण सुनीताबाई स्पष्ट सांगतात की, भाईंच्या भिडस्तपणामुळे त्याला तो कधीही उभा करता आला नसता. भाईंजवळ व्यवहारी बुद्धी नव्हती. त्या म्हणतात, आमच्या संसाराची आर्थिक बाजू मी सांभाळली. हा एक मजेदार बौद्धिक खेळ होता. त्याचे श्रम नव्हते. मला हा खेळ आवडला. त्याची चटक लागली म्हणा, मग जमेल तसा तो मी खेळत आले, पण यामुळे लोकांची दूषणे सुनीताबाईंना झेलावी लागली हेही तितकेच खरे. विशेषतः ‘तुज आहे तुजपाशी’ यातल्या प्रयोगांच्या वेळी ‘नाटककार’ रॉयल्टीसाठी वंचित राहिला नि त्यासाठी सुनीताबाईंनी कोर्ट केस करून ती कशी जिंकली त्याबद्दलचा साद्यंत इतिहास वाचल्यावर आपले मत बदलते. बाईंना लोकांनी दिलेली दूषणे किती अनाठायी होती हेही लक्षात येते आणि सत्यासाठीही झगडावेच लागते याचा विषादही वाटतो. सुनीताबाई ही ‘पैशाच्या मागे लागलेली व्यक्ती’ असा त्यांच्याबद्दल जो अपप्रचार झाला त्या समाजाचे निराकरणही घडते आणि खरेच बरे वाटते.

आचार्य अत्रे, राम जोशी यांच्याबद्दलचे किस्से मुळातूनच वाचण्याजोगे आहेत. मनुष्य स्वभावाच्या अनाकलनीय पैलूंवर स्वच्छ प्रकाश टाकण्याचा प्रयत्न लेखिका सुनीताबाईंनी केला आहे. आणीबाणीच्या काळातील घालमेल तर इतकी, इतकी वाचनीय झाली आहे की विचारता सोय नाही. आपल्या पत्नीस जीएंची पत्रे येतात हे भाईंना माहीत होते, ते ती वाचीतही असत. सुनीताबाईंचे उत्तरही वाचीत, पण लोकांशीं याबाबत बोलताना ‘जीएं’चे मला पत्र आले’ असा उल्लेख करीत. हे वाचताना प्रत्येक स्त्री वाचिकेस आत्मानुभव यावा. पुस्तकाचा शेवट चटका लावणारा आहे. आफ्रिकेतील ‘इक’ ही जमात कोणत्याही नात्यावर विश्वास ठेवीत नाही. वात्सल्य, प्रेम, लळा, माया, आपुलकीविरहित जगणे. आपल्या मरणाने मरणे! ‘एकमेक’ हा शब्दच अवगत नाही. ‘नातं’ हा शब्द दिवंगत झालाय प्रळयातून वाचलंच तर ते पिंपळपान कोणते गुणधर्म घेऊन येईल? इथेच पूर्णविराम.

जेव्हा पुस्तक पूर्णविराम घेते तेथून जर स्वतःच्या मनाशी संवाद सुरू झाला तर ते या पुस्तकाचे श्रेय आहे, यश आहे. माझ्या मनी तो सुरू झाला. तो आपल्या मनीही सुरू होईल अशी मला खात्री आहे. म्हणून रसिक वाचकहो, जरूर वाचा, ‘आहे मनोहर तरी’.

‘आहे मनोहर तरी…’
लेखिका – सुनीता देशपांडे
प्रकाशक – मौजमजा प्रकाशनगृह
किंमत – 125 रु. इ.स. 2000 ची आवृत्ती 7 वी

[email protected]