परीक्षण – आत्मिक आनंदाचा शोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अस्मिता प्रदीप येंडे

सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मानवी जीवन हे सुख-दुःखांनी भरलेले असते. त्यात ‘सुख वाटे जवापाडे दुःख पर्वताएवढे’ असे तुकाराम महाराजांनी म्हटलेले आहे. त्यामुळे छोटय़ा छोटय़ा गोष्टीत सुख शोधून जीवन जगण्याचा एक मोलाचा संदेश त्यांनी दिला. प्रत्येकाच्या सुखाच्या व्याख्या वेगवेगळ्या असतील

‘जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूचि शोधून पाहे!’

समर्थांनी विचारी मनालाच जगातील सर्वसुखी प्राणी कोण हे शोध असे सांगितले. त्याप्रमाणे हे मन संपूर्ण सारासार विचार करून सुखी जीवाच्या शोधात निघाले असता वरपांगी सुखी दिसणारे सर्वच जीव मुळात कुठल्याशा सुखाच्या शोधात आहेत आणि त्या सुखाच्या अभावामुळे त्यांना संपूर्णपणे सुखी असे म्हणता येणे शक्य नाही, असा मनाचा विचार झाला.

आनंद म्हणजे नेमके काय? कुठे असतो हा आनंद? सुख म्हणजे नक्की काय असतं? याची प्रचीती देणारे, जीवनातील आनंद तरंग शोधण्यास साथसोबत करणारे डॉ. अरुंधती भालेराव यांचा ‘आनंदकुळ’ हा ललित लेखसंग्रह म्हणजे आनंदाचा गंध आहे. डॉ. भालेराव या साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या कामातून त्यांना आनंद मिळतो. ‘आनंदकुळ’ संग्रहातील लेख छोटेखानी असले तरी जीवनाचे मर्म त्यातून उलगडते. साधी, सोपी भाषाशैली मनाला भावते. लेखिकेने कबीरचे दोहे, कविता, महान व्यक्तींचे विचार यांचा वापर करून उदाहरणासहित लेख सुंदरतेने फुलवले आहेत. म्हणतात ना ‘खुबसूरती सादगी में ही है!’

‘आनंद जन्मला गं बाई’, ‘आनंदाचा झरा’, ‘आनंदी आनंद गडे’, ‘आनंदाचा छोटा पॅक’, निर्मळ आनंद’ या लेखांतून अनेक अनुभवातून मिळालेल्या आनंदाच्या क्षणांची सुरेख आनंदमाला मनाला सुखावते व डोळ्यात आनंदाश्रूही आणते. लेखिका म्हणते की, सुख समाधानातच असते. जोपर्यंत अपेक्षा वाढत राहतील, समाधान नसेल तर सुख कसे मिळेल. त्यामुळे समाधानी असणं यातच सुखी जीवनाचं सार आहे. ‘मंतरलेले बालपण’मधून लेखिकेने आपल्या बालपणीच्या रम्य आठवणींना उजाळा दिला आहे. खरेच लहानपणी कोणत्याही गोष्टीचा आनंद वेगळाच असायचा. त्यासाठी पैसे, महागडे कपडे, मोबाईल याची गरजच नव्हती. निरागसतेच्या त्या जगात खरे सुख असते. कारण त्यात स्पर्धा नसते, भविष्याची चिंता नसते. असतो तो फक्त निःस्वार्थ आनंद… तो सध्या हरवत चालला आहे. सुखाच्या व्याख्या बदलत आहेत.

वाचकहो, ‘आनंदाचे भांडण’ही असते बरे, म्हणजे नेमके काय? यासाठी पुस्तक वाचायला हवे. आनंदाची वेगवेगळी रूपं, त्याची ओळख या पुस्तकाने खूप सुंदररीत्या करून दिली आहे. आपण जेवढा आनंद दुसऱयांना द्याल, तेवढाच किंबहुना त्याहून जास्त आनंद आपल्याला प्राप्त होईल. आनंद दिल्याने वाढतो. दुसऱयाला मदत करून, आपल्या प्रियजनांना प्रेमाने जेवू घातल्याने, कौतुक केल्याने, लहान बालकांसोबत वेळ घालवल्याने, कोणाला भेटवस्तू दिल्याने, समाजसेवा केल्याने… प्रत्येकाचा आनंद वेगळा आहे.

आपण स्वतः आनंदी असू तरच आपण दुसऱयाला आनंद देऊ शकतो. तुम्हीच मनाने रिक्त असाल तर दुसऱयाला आनंद कसा देणार. संत तुकाराम महाराज म्हणतात,

आनंदाचे डोही आनंद तरंग
आनंदाचे अंग आनंदाचे

म्हणजे मी आनंदाचा, ब्रह्मानंदाचा डोह झालो आहे. म्हणून त्याच्यामध्ये आनंदाच्याच लाटा येतात. कारण आनंदाचे अंग आनंदच आहे. गुरु गोपाल दास म्हणतात, दुःख हे आपोआप होतं, पण आनंद हा आपला आपणच शोधायचा असतो. हॅप्पीनेस इज् अ चॉइस… आनंद हा आपल्या अंतरंगातच असतो फक्त तो व्यक्त होणं, त्याला मूर्त रूप देणं गरजेचं असतं.
प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतो. काही संकटांना सामोरे जातात तर काही जण परिस्थितीसमोर हतबल होतात. कोणतेही संकट आले की आपण ताण घेतो. समस्येकडे आपण कसे पाहतो त्यातून ते संकट आहे की संधी हे ठरते. यातूनही आनंद मिळवता येतो. निराशेने भरलेल्या जीवनात सकारात्मकतेचे चांदणे पसरवण्याचे काम ‘आनंदकुळ’च्या माध्यमातून लेखिकेने केले आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात आनंद हरवत चालला आहे, तो आनंद शोधण्याचा नवा मार्ग या ललित लेखांनी दाखवला आहे. आनंद नेहमी चंदनासारखा असतो, दुसऱयाच्या कपाळावर लावा आपलीही बोटे सुगंधित करून जातो. हेच आनंदाचे चंदन वाचकांच्या जीवनाला सुगंधित करून जाईल.

‘आनंदी आनंद गडे
जिकडे तिकडे चोहीकडे’
बालकवींच्या कवितेच्या ओळी आठवणं स्वाभाविक आहे. आनंद हा सगळीकडे पेरलेला आहे. फक्त तो ओळखता यायला हवा. शेवटी व्यक्तीची विचारप्रवृत्ती ही सकारात्मक हवी, तरच रिकामी कुपी आनंदाच्या अत्तराने भरून जाते.
जगण्याला नवा आयाम देण्यासाठी, आनंद घेण्यासाठी जी सकारात्मक ऊर्जा हवी, ती ऊर्जा या संग्रहातून नक्की मिळेल… आनंदानुभव अनुभवा!

आनंदकुळ
लेखिका ः डॉ. अरुंधती भालेराव
प्रकाशक ः व्यास क्रिएशन्स
मूल्य ः रुपये 200/-